मुंबई – सिनेमा आणि नाटक हा समाजाचा आरसा आहे असं म्हटलं जातं, कारण समाजात ते आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पाहायला मिळते, महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी पुढाकार घेईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.
मुख्यमंत्र्याच्या या विधानावर भाजपा आमदार नितेश राणेंनी भाष्य केले आहे, नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलंय की, परवडणारी सिनेमागृह सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री बोलले, पण मी ते याआधीच माझ्या मतदारसंघात १ सिनेमागृह सुरु केलं आहे, २ वर्षापूर्वी देवगड येथे पहिला कंटेनरमध्ये सिनेमागृह सुरु करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने या स्टडी मॉडेल आणि अंमलबजावणीवर पुढे येऊन चर्चा करायला हवी. पण राजकारण पहिलं येतं, मी मदत करायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
पहिले कंटेनर थिएटर देवगडात साकार
साधारण शंभरएक प्रेक्षक बसतील इतकी आसनक्षमता, संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, सर्वोत्तम दर्जाचे साऊंड प्रूफ तंत्रज्ञान आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, असे सर्व सुविधायुक्त, परिपूर्ण 'कंटेनर थिएटर' कोकणातील स्थानिकांच्या पसंतीस उतरत आहे. विशेष म्हणजे हे थिएटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिथे बसवता येऊ शकते. आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगडनंतर सावंतवाडी येथेही कंटनेर थिएटर उभारण्यात येत आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मनोरंजन हे एकमेव असे माध्यम आहे जिथे आपण आपले दु:ख काही वेळाकरिता का होईना विसरुन जातो. मनोरंजन क्षेत्र मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचे काम करीत असते. या क्षेत्रामुळे एक चांगला समाज घडण्यास मदत होत असते. त्यामुळेच महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला या क्षेत्राचा आनंद घेता यावा यासाठी ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. राज्य शासनाचा एखादा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकार हे एक उत्तम माध्यम आहे. कारण जनमानसात कलाकारांची लोकप्रियता आणि त्यांच्या मनातील स्थान असते. त्यामुळे महाराष्ट्रातील कलाकारांच्या पाठिशी राज्य शासन कायम उभे असून कलाकारांना बळ देण्याचे काम करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तसेच हिंदी आणि इतर भाषांबरोबरच मराठीतही उत्तम चित्रपट बनत असतात. पण काही वेळा एकाच दिवशी अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहातले शो (खेळ) मिळत नाही आणि पर्यायाने या चित्रपटांचे नुकसान होते. त्यामुळेच मराठी चित्रपटांसाठीही पुरेशा प्रमाणात शो राखीव ठेवण्याबाबत राज्य शासन आग्रही असेल, मागील अनेक वर्षात या क्षेत्रातून अनेक कलाकार घडले. याच क्षेत्रामुळे अनेकांना रोजगारही मिळाले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या चित्रीकरणासाठी चांगली जागा विकसित करणे, नव नवीन तंत्रज्ञान आणणे यासाठी प्रयत्न केले जातील. मुंबईत असलेल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीचे येणाऱ्या काळात दर्जोन्नती करण्यावर भर असेल. आज देशासह राज्यावरही कोविड-19 चे संकट आहे. गेल्या आठ महिन्यानंतर आजपासून सिनेमागृहे व नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेसह सुरु होत आहेत. त्यामुळे या क्षेत्राला बळकटी देत असताना प्राधान्याने कोणती कामे करण्याची आवश्यकता आहे हे ठरविणे आवश्यक असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले.