मुंबई - सध्या राजकीय पटलावर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. विरोधकांना सळो की पळो सोडणाऱ्या संजय राऊतांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला भरवसा असल्याचं पुन्हा दाखवून दिले आहे. कंगना प्रकरणावरुन संजय राऊत यांनी आक्रमक शैली सगळ्यांनीची पाहिली आहे. संजय राऊतांवर चहुबाजूने टीका होत असताना शिवसेनेने संजय राऊतांना मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे.
शिवसेनेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली. यात संजय राऊत यांनी मुख्य प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत १० प्रवक्त्यांची नेमणूकही उद्धव ठाकरेंनी केली आहे. यामध्ये खासदार अरविंद सावंत, कोल्हापूरातील खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियंका चतुर्वेदी, आमदार नीलम गोऱ्हे, मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा समावेश करण्यात आला आहे.
विरोधकांवर बरसणारे संजय राऊत
क्राईम पत्रकार म्हणून संजय राऊतांनी पत्रकारिता क्षेत्रात स्वत:चा दबदबा निर्माण केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यावर सामनाची जबाबदारी दिली. याच काळात शिवसेनेकडून संजय राऊत यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले. मातोश्रीच्या अगदी जवळ असणाऱ्या नेत्यांपैकी संजय राऊत यांचा समावेश आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेला सामना आणि त्यातील अग्रलेख याद्वारे अनेकदा संजय राऊत यांनी आक्रमक शैलीतून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
देशपातळीपासून राज्यातील कोणत्याही प्रश्नावर संजय राऊत यांनी नेहमी पक्षाची बाजू ठामपणे आणि आक्रमकपणे मांडली आहे. इतकचं नाही तर अलीकडे राज्याच्या राजकारणात जी उलथापालथ झाली त्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा हा संजय राऊत यांचाच आहे. संजय राऊत यांच्यामुळे इतिहासात कधीही न घडलेलं समीकरण राज्यात साकारलं गेले. भाजपावर जहरी टीकास्त्र, खुमासदार शैलीत फटकारे यामुळे संजय राऊत नेहमी विरोधकांच्या निशाण्यावर राहिले आहेत. संजय राऊत यांच्यामुळेच राज्यात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आलं.
गेल्या महिनाभरापासून संजय राऊत पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहेत. अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात शिवसेनेवर होणारी टीका रोखण्यासाठी संजय राऊत पुढे सरसावले आहेत. कंगना राणौत प्रकरणी संजय राऊत यांनी थेट त्यांच्या शैलीतून कंगनाला फटकारलं आहे. कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाने राजकीय वातावरण पेटलं आहे. त्यामुळे शिवसेनेने राऊतांची मुख्य प्रवक्तेपदी नेमणूक केल्याने आगामी काळात ते विरोधकांवर पुन्हा बरसणार आहेत.