अर्थसंकल्पीय अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावरुन भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी विकास महामंडळाची स्थापना तातडीनं करण्याची मागणी करत भाजपनं मुख्यमंत्र्यांनी विदर्भ हे त्यांचं आजोळ असल्याची आठवण करुन दिली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका असं म्हटलं. "विदर्भ माझं आजोळ आहे. मी विसरलो नाही. पण माझं आजोळ माझ्यापासून तोडण्याचा मनात सुरू असलेला विचार पहिले सोडून द्या. विदर्भ वेगळा होणार नाही आणि तो मी होऊनही देणार नाही. विदर्भाला एकत्रित ठेवूनच त्याच्यासोबत महाराष्ट्राटा विकास केल्याशिवाय राहणार नाही. फक्त विदर्भाचा कणव आणायचा, मला माझ्या आजोळची आठवण करून द्यायची. माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
मुदतवाढीवरून वातावरण तापलं
वित्तमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या मांडल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी या मागण्यांमधील रकमेचं आणि ८ मार्चला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातील निधीचं समन्यायी वाटप राज्यपालांच्या सूत्रांनुसार होणार आहे का, अशी विचारणा केली होती. तसंच विकास मंडळांना मुदतवाढ देण्याची जोरदार मागणीही केली. मंडळांना राजकीय डावपेचात अडकवू नका, असंही ते म्हणाले होते. त्यावर, अजित पवार यांनी मंडळांना मुदतवाढ देण्याची आमची भूमिका आहे, असं सांगतानाच आधी राज्यपालांनी आमदारांची नियुक्ती करावी, आम्ही लगेच मुदतवाढ देऊ, असं विधान केलं होतं.