मुंबई - राज्यपालांच्या अभिभाषणावर आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चौफैर हल्ला केला. यावेळी आक्रमक झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या शाब्दिक बाणांच्या निशाण्यातून केंद्र सरकार आमि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही सुटले नाही. विधिमंडळात शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला. शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, विरोधी पक्षाने शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. आमचं सरकार शेतकऱ्यांसोबत आहेच. मात्र दिल्लीच्या सीमेवर जे शेतकरी आंदोलन करत आहे. त्यांना दिल्लीत येता येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकले. ज्या तारांचं कुंपण देशाच्या सीमेवर टाकले पाहिजे, ते राजधानीच्या रस्त्यावर टाकले आहे. मात्र चीनसमोरून मात्र या सरकारने पळ काढला. शेतकऱ्यांच्या मार्गावर खिळे आणि चीन दिसला की पळे, अशी यांची अवस्था आहे. देश ही तुमची खासगी मालमत्ता नाही, तसेच महाराष्ट्र तर नाहीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नसाल तर भारत माता की जय म्हणण्याचाही अधिकार तुम्हाला नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. दरम्यान, "भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तेवढी तुमची पात्रता नाही. ज्या बाळासाहेबांचा उल्लेख तुम्ही करत आहात. त्याचं हिंदुत्व हे काही शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नव्हतं. बाबरी मशिदी पाडली गेली तेव्हा सर्व 'येर गबाळे' पळून गेले होते. एकटे बाळासाहेब आक्रमकपणे उभे राहिले होते. त्यामुळे भाजपनं हिंदुत्वाच्या गप्पा मारू नये. जम्मू-काश्मीरमध्ये युती करताना भाजपचं हिंदुत्व कुठं गेलं होतं?", असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: "शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे", विधानसभेतून उद्धव ठाकरेंचा मोदींवर बोचरा वार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 5:14 PM