“विधानसभा अध्यक्ष कोण होईल याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील”; शिवसेना मंत्र्याचं विधान
By प्रविण मरगळे | Published: February 5, 2021 09:29 AM2021-02-05T09:29:28+5:302021-02-05T09:32:44+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले इच्छुक होते, दोन दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी काँग्रेस हायकमांडची दिल्लीत जाऊन भेट घेतली
मुंबई – काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींमुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे, एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नेत्यांची लॉबी सुरू झाली असताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी राजीनामा दिला. पटोलेंच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती आहे. त्यातच शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे आघाडीतला अविश्वास वाढवण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले इच्छुक होते, दोन दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी काँग्रेस हायकमांडची दिल्लीत जाऊन भेट घेतली, त्यानंतर गुरूवारी त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. काँग्रेसकडून अध्यक्षपद घेऊन त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे, परंतु विधानसभा अध्यक्षपद आता रिक्त असल्याने ते खुलं झालं आहे असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विधानसभा अध्यक्षपदासाठी दावा केला आहे.
विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत तणाव; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज?
यातच शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी राज्यात मंत्री कोण होईल, विधानसभा अध्यक्ष कोण होणार हे मुख्यमंत्री ठरवतील, शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे असं विधान करून काँग्रेस-राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘सत्तेचा फॉर्म्युला तयार, फक्त बटण दाबायची देरी' बंद दाराआड नेमकी चर्चा काय घडली?
भाजपावर केली टीका
काही वर्षापूर्वी केंद्र सरकारने अच्छे दिन आयेंगे म्हणत आम्ही पेट्रोलचे दर कमी करू, डिझेलचे दर कमी करू, गॅस सिलेंडर दर कमी करू असं म्हणत सत्ता आणली, गेल्या ७ वर्षापासून भाजपा सत्तेवर आली, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणं म्हणजे त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर होतो, त्यामुळे शिवसेनेकडून इंधन दरवाढीविरोधात राज्यभरात आंदोलन पुकारलं आहे. हे दर कायमस्वरुपी कमी असले पाहिजेत अशी आमची आग्रही मागणी आहे असं उदय सामंत यांनी सांगितले.
तर शिवसेना केंद्र सरकारविरोधात आंदोलन करतेय म्हणून आपणही आंदोलन करतोय हे दाखवण्यासाठी वीजबिलाविरोधात ते आंदोलन करत असतील, पेट्रोल-डिझेलचे दर वाढतायेत त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा आंदोलन करतंय असा टोला मंत्री उदय सामंत यांनी भाजपाला लगावला आहे.