हाथरस घटनेवरुन बॅकफूटवर असलेल्या मुख्यमंत्री योगींचा आक्रमक पवित्रा; विरोधकांवर गंभीर आरोप

By प्रविण मरगळे | Published: October 4, 2020 08:14 PM2020-10-04T20:14:57+5:302020-10-04T20:17:47+5:30

Hathras Gangrape, CM Yogi Adityanath News: तसेच या षडयंत्रांविरोधात पूर्ण ताकदीनं आपल्याला लढून विकासप्रक्रिया पुढे घेऊन जावी लागेल असंही ते म्हणाले आहेत.

CM Yogi aggressive on Hathras rape incident; Serious allegations made against opponents Congress | हाथरस घटनेवरुन बॅकफूटवर असलेल्या मुख्यमंत्री योगींचा आक्रमक पवित्रा; विरोधकांवर गंभीर आरोप

हाथरस घटनेवरुन बॅकफूटवर असलेल्या मुख्यमंत्री योगींचा आक्रमक पवित्रा; विरोधकांवर गंभीर आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देविरोधक उत्तर प्रदेशात जातीय दंगल पेटवण्याचं षडयंत्र रचत आहेत.या प्रकरणात एसआयटी चौकशी सुरू होती परंतु योगी सरकारने केली सीबीआय चौकशीची शिफारस प्रसारमाध्यमे आणि इतर राजकीय पक्षांच्या लोकांनी या कुटुंबाला भडकवले, भाजपाच्या माजी आमदाराचा आरोप

लखनऊ – उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे राजकीय वातावरण तापू लागलं आहे. सत्ताधारी योगी सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत. या घटनेवरुन सुरुवातीला बॅकफूटवर असणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारने आता विरोधकांवर निशाणा साधला आहे. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर नाव न घेता गंभीर आरोप लावले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, विरोधक उत्तर प्रदेशात जातीय दंगल पेटवण्याचं षडयंत्र रचत आहेत. राज्यातील विकास कामं रोखण्यासाठी विरोधक असं राजकारण करत आहेत. ज्यांना विकास होत असलेला आवडत नाहीत असे लोक देशात आणि राज्यात जातीय दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. या दंगलीच्या माध्यमातून राज्यातील विकास थांबेल आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याची संधी मिळेल असं विरोधकांना वाटत आहे असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या षडयंत्रांविरोधात पूर्ण ताकदीनं आपल्याला लढून विकासप्रक्रिया पुढे घेऊन जावी लागेल असंही ते म्हणाले आहेत.

योगी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर

हाथरसमधील मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि तिच्या हत्येनंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झाले होते. विरोधी पक्षांशिवाय भाजपामधील नेत्यांनीही पीडितेचा मृतदेह जाळल्याच्या प्रकरणाबाबत योगी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी शनिवारीही पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी हाथरस येथे पोहोचले, तेव्हा मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. राहुल गांधी यांना धक्काबुक्की करुन अटक केली होती. काँग्रेसशिवायसमाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षानेही योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

डीएमला हटवण्याची मागणी

या प्रकरणात एसआयटी चौकशी सुरू होती परंतु विरोधी पक्षांनी घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. यानंतर शनिवारी सायंकाळी उशिरा मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतरही लोकांच्या मनात चौकशीबाबत संशय आहे. डीएम असताना सीबीआय चौकशी निःपक्षपाती कशी करू शकते असा प्रश्न बसपाने उपस्थित केला. अन्य पक्षांनीही डीएम यांना हटवण्याची मागणी केली.

भाजपाच्या माजी आमदाराने आयोजित केली पंचायत, पीडित कुटंबावरच केले आरोप

आज हाथरसमध्ये एक पंचायतही बोलावण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार ही पंचायत भाजपाचे माजी आमदार राजवीर सिंह पलहवान यांनी बोलावली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी योगी सरकारने जे आदेश दिले आहेत त्यामुळे प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होईल, असा दावा या पंचायतीत करण्यात आला. ज्या दिवशी ही घटना घडली त्यानंतर बलात्कार झाल्याचे चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात आले, ही माहिती चुकीची आहे, असे राजवीर सिंह पलहवान यांनी सांगितले. राजवीर सिंह म्हणाले की, ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ व्हायला हवं. यासाठी सर्वांची नार्को चाचणी झाली पाहिजे. सीबीआय तपासाचा आदेश आला पाहिजे. आम्ही राज्य सरकारकडे ही मागणी केली होती. आता या पंचातीमध्ये जमलेले लोक प्रदेश सरकारच्या निर्णयावर समाधानी आहेत, असे राजवीर सिंह यांनी सांगितले. सरकारचे आभार मानण्यासाठी ही पंचायत बोलावली आहे असेही ते पुढे म्हणाले.

१४ सप्टेंबर रोजी संबंधित तरुणी आणि तिचा भाऊ पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आले होते. मात्र त्यावेळी माध्यमांनी दखल घेतली नव्हती. पण नंतर प्रसारमाध्यमे आणि इतर राजकीय पक्षांच्या लोकांनी या कुटुंबाला भडकवले. तीन दिवसांनंतर साक्ष बदलवण्यात आली. त्यानंतर दर तीन दिवसांनी साक्षी बदलत गेल्या आणि माध्यमे टीआरपीसाठी बातम्या चालवत राहिले, असे राजवीर सिंह म्हणाले. दरम्यान, राजवीर सिंह यांनी सामूहिक बलात्काराचे वृत्तही फेटाळून लावले. मागासवर्गीय समाजातील एका तरुणीला मारहाण झाल्याची खोटी माहिती पसरवून हाथरसला बदनाम करण्यात आले, असा दावाही त्यांनी केला आहे.

Web Title: CM Yogi aggressive on Hathras rape incident; Serious allegations made against opponents Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.