अहमदनगर : राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची मते आजमावून घेतल्यानंतर अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अधिकृत घोषणा मात्र अद्याप झाली नसून, राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या यादीत ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जिल्ह्यातील नेत्यांची बुधवारी बैठक झाली. अहमदनगर लोकसभा मतदरासंघात विखे-गडाख खटला गाजला होता. त्याची आठवण करून देत अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शरद पवार यांनी प्रतिष्ठेची करत ही निवडणूक १९९१ ची लढाई आहे आणि ती जिंकायचीच, असे निर्देश कार्यकर्त्यांना दिले.माजी खासदार, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे पुत्र प्रशांत गडाख यांच्या नावाची राष्ट्रवादीकडून चर्चा होती. मात्र एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दोन घराण्यांमध्ये युद्ध करण्यात मला रस नसल्याचे सांगत निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरमध्ये आ. जगताप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 4:47 AM