मुंबई – प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आणि शिवसेना यांच्यातील ४ वर्षापूर्वीचा जुना वाद संपुष्टात आल्याचं दिसून येत आहे. शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी एका व्हिडीओची क्लीप शेअर करत कपिल शर्मा आणि त्यांच्या कार्यक्रमाचे आभार मानले आहेत. त्यावर कपिल शर्मा यानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड योद्धांचा कार्यक्रम ‘द कपिल शर्मा कॉमेडी शो’मध्ये आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात कोरोनाच्या संकटात कर्तव्य निभावत असलेल्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी अनेक अनुभव शेअर केले. कशारितीने कोविड काळात राज्य सरकार, मुंबई महापालिका प्रशासन यांनी डॉक्टरांचे मनोबल वाढवलं त्याचा फायदा कोविड रुग्णांना झाला हे सांगितलं गेले. शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी या कार्यक्रमातील एका छोट्या व्हिडीओची क्लीप शेअर करत कपिल शर्माचे आभार मानले आहेत.
यामध्ये अमेय घोले यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि मेहनतीमुळे हे सगळं शक्य झालं. कपिल शर्मा पाजी तुमचे धन्यवाद, डॉ. गौतम भन्साळी आणि डॉ. मुज्फझल लकडवाला तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद असं त्यांनी म्हटलं आहे तर यावर कपिल शर्मा यांनी स्माईल देत रिप्लाय केला. त्यावर अमेय घोळे यांनी सर्वांचे मनोरंजन करुन आनंद पसरवणे, माणुसकी टिकवण्यासाठी आभार आहे असं कपिल शर्मा यांना म्हटलं आहे.
काय होता वाद?
२०१६ मध्ये कपिल शर्माने मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे लाच मागितल्याबाबत ट्विट केले होते. कार्यालयाच्या बांधकामासाठी ही लाच मागितली होती. मात्र कालांतराने हे कार्यालय अनाधिकृत असल्याचं समोर आलं. कपिलने केलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियात धुमाकूळ माजला होता. महापालिकेनेही त्या लाचखोर अधिकाऱ्याच्या नावाबाबत खुलासा करण्याची मागणी केली होती. मात्र कपिल शर्मा याच्या ट्विटवरुन विरोधकांनी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला होता.