मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी येणारे दिवस कठीण असतील असं विधान भाजपा खासदार मनोज कोटक यांनी केलं आहे. इतकंच नाही तर येत्या काही दिवसांत राज्यातील आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार असून त्यांनाही राजीनामा द्यावा लागेल असा दावा मनोज कोटक यांनी केला आहे. त्यामुळे आता हे मंत्री कोण असणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप लावले होते. या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. हे संपूर्ण प्रकरण हायकोर्टात गेल्यानंतर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या आधारे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होणार
जबाब नोंदवण्यासाठी सकाळी अकरा वाजता अंधेरीतील डीआयओच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. रविवारी याचप्रकरणी देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व सहाय्यक एस. कुंदन यांची सुमारे आठ तास चौकशी करून जबाब नोंदविण्यात आले. आता देशमुख यांचा जबाब नोंदवला जाईल. त्यानंतर सीबीआय सोमवारी प्राथमिक चौकशीचा अहवाल निष्कर्षासह उच्च न्यायालयात सादर करणार आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांनी निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याच्या केलेल्या आरोपाबाबत १५ दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून याप्रकरणी चौकशी केली जात आहे.