आमच्यावर टीका करा, पण पाच वर्षात काय केलं ते तरी सांगा!
By अतुल कुलकर्णी | Published: April 14, 2019 06:39 AM2019-04-14T06:39:04+5:302019-04-14T06:56:49+5:30
देशात ४ कोटी बेरोजगार आहेत. शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. नोटबंदीनंतर उद्योग ठप्प झाले आहेत.
- अतुल कुलकर्णी
मुंबई : देशात ४ कोटी बेरोजगार आहेत. शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. नोटबंदीनंतर उद्योग ठप्प झाले आहेत. सरसकट कर्जमाफीची घोषणा अंमलात आलेली नाही. १५ लाख बँकेत जमा करतो म्हणाले ते ही खोटे निघाले. जीएसटीमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक जर पवार कुटुंबावर टीका करुन होणार असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी टीका करावी, पण देशातल्या जनतेसाठी काय केले ते आधी सांगावे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. त्यांच्याशी झालेली ही बातचित.
मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला, त्याचा त्यांना राजकीय फायदा होईल का?
आजवर कोणत्याही पंतप्रधानांनी लष्काराला पुढे करुन मतं मागीतलेली नाहीत. यांनी तर जाहीर सभेत शहिदांचे फोटो पाठीशी लावून भाषणे केली, शहिदांसाठी मतं द्या अशी याचना केली. अखेर लष्काराला राजकारणापासून दूर ठेवा असे पत्र अनेक निवृत्त अधिकाऱ्यांनी संरक्षणमंत्र्यांना दिले. यामुळे देशाची सगळ्या जगात शोभा होत आहे याचे तरी भान रहायला हवे...
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर जिल्ह्यात भाजपाचा प्रचार करत आहेत. त्यांना या पदावरुन दूर करण्याची मागणी करणार का?
आत्ता त्यावर बोलणे योग्य नाही. दोन्ही बाजूंनी कोणी चुका करत असेल तर त्यांच्या लेखी तक्रारी करा असे दोघांच्या संयुक्त बैठकीत सांगण्यात आले होते. अंकूश काकडे यांनी विखेंच्या विरोधात तक्रार केली आहे. कोल्हापूरला सतेज पाटील टोकाचे वागत आहेत. एकदा आघाडी केली की झाले गेले, गंगेला मिळाले समजून आघाडी धर्म पाळायला पाहिजे. पण दुर्देवाने हे लक्षात घेतले जात नाही. काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते स्वत: उमेदवार असल्याने ते व्यस्त आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर त्यावर चर्चा होईल.
विधानसभेतही आघाडी राहणार का?
हो. आम्ही त्या दृष्टीनेच आघाडी केली आहे. लोकसभेच्या निकालानंतर बºयाच उलथापालथी होतील. दोन्ही पक्ष योग्य त्या भूमिका घेतील.
राज ठाकरे भाजपा विरोधी प्रचार करत आहेत. त्यांना विधानसभेत सोबत घेणार का?
आघाडी करताना सगळ्यांना विचार पटावा लागतो. लोकसभेच्यावेळी माझे मत वेगळे होते पण काहींना ते पटले नाही. त्यामुळे तोडगा निघाला नाही मात्र त्या बैठकीत ज्यांनी राज यांना सोबत घेण्यास विरोध केला त्यापैकी काहींना आता त्यांची सभा स्वत:च्या मतदारसंघात हवी आहे. राज यांनी स्वत:च्या हिमतीने पक्ष उभा केलाय. पण आत्ताच त्यावर बोलणे घाईचे ठरेल. सर्वांना मान्य असेल आणि राज ठाकरे यांनाही ते पटत असेल तरच विधानसभेत ते सोबत येतील.
चंद्रकांत पाटील सतत बारामतीची जागा जाणार असे बोलत आहेत. नेमकी स्थीती काय आहे? तुम्ही उत्तर देताना दिसत नाहीत.
कोणाला महामंडळ देतो, कोणाला पाठबळ देतो, कोणाला आणखी काही देतो अशा आॅफर सध्या ते देत आहेत. त्यांनी बाहेरची रोजंदारीवरची टीम आणलीय. त्यांना दिवसाला पगार, जेवण देऊन काही ठिकाणी ठेवलेले आहे. पण गेली ३० वर्षे मी बारामती मतदारसंघ पहात आलोय. आम्ही तेथे काय केले आहे हे जनतेला माहिती आहे. ज्यांना नुसत्या पोकळ गप्पा मारण्यात फुशारकी वाटते त्यांनी ते जरुर करावे, निकालातूनच उत्तर मिळेल.
तुमच्या काळात सिंचन विभागात गैरप्रकार झाल्याचे आरोप करत भाजपाने राज्यात सत्ता हस्तगत केली. आता साडेचार वर्षात राज्यात सिंचनात किती प्रकल्प पूर्णपणे हातावेगळे करण्यात या सरकारला यश आले आहे?
तुम्हीच तपासून पहा. वास्तव कळेल. त्यावेळी राज्यभर संशयाचे वातावरण तयार केले. प्रशासनाचे नीतिधैर्य खच्चीकरण होईल अशा रितीने अधिकाºयांवर गुन्हे दाखल करणे सुरु केले. पहिले वर्ष तर प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता कोणी द्यायची याची फाईल फिरत राहीली. दोन वर्षे चौकशीत गेली. त्यामुळे चांगले अधिकारी कोषात गेले. या सगळ्याचा कामावर विपरित परिणाम झालाय.
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीमुळे काँग्रेस, राष्टÑवादीचे नुकसान किती होईल?
फार नुकसान नाही होणार. कारण जनतेला कळून चुकले आहे की ते आणि ओवेसी भाजपसाठी काम करत आहेत. आम्ही त्यांना ६ जागा देण्याची तयारी दाखवली होती पण त्यांनी नांदेड आणि बारामती मागितली त्याचवेळी कळाले की, त्यांना आमच्यासोबत यायचे नाही.
पार्थ पवारना उमेदवारी दिली. त्यामुळे घराणेशाहीची टीका झाली. तुम्हाला तरी त्याला उमेदवारी देणे पटले का?
मी त्याचे समर्थन करणार नाही. पण पाटी कोरी असताना २८ वर्षापूर्वी कोणतीही निवडणूक लढवलेली नसताना मला लोकसभेचे तिकीट राजीव गांधी व शरद पवार यांनी दिले होते. एकनाथ शिंदे यांच्या मुलाची पाटी कोरी असताना ते निवडून आले, मुकूल वासनिक वयाची २५ वर्षे पूर्ण होताच राज्यसभा सदस्य झाले. मावळमध्ये ही शेकापने आग्रह धरला, पिंपरी चिंचवडमध्ये मी काम केले होते. त्यामुळे सगळ्यांच्या आग्रहाखातर त्याला उमेदवारी दिली आहे.
>आता मोदी शरद पवारांवर बोलताहेत...
पंतप्रधान शरद पवार यांनाच टीकेचे का लक्ष्य करत आहेत असे विचारले असता, लोकमतशी बोलताना अजित पवार म्हणाले, शरद पवार आणि पवार घराणे काय आहे हे महाराष्टÑातील जनता ओळखते. आम्ही कसे आहोत हे सगळ्यांना माहिती आहे. तरीही मोदी आमच्यावर टीका करत आहेत.
आजपर्यंत अनेक पंतप्रधान देशाने पाहिले, ते निवडणुकीच्या काळात केलेले काम आणि पुन्हा सत्तेवर आलो तर काय करु हे सांगायचे. मात्र मोदींनी आधी नेहरु, गांधी घराण्यावर घसरायचे. आता ते शरद पवारांवर बोलत आहेत, असेही पवार म्हणाले.
>पंतप्रधान मोदी यांच्याकडे सांगायला काही नाही म्हणून कधी पुलवामा, तर कधी हिंदुत्वाचे कार्ड तर कधी शरद पवार, कधी संदर्भ नसणारे जुने पुराणे मुद्दे काढून जनतेची दिशाभूल करणे सुरु आहे.तुमच्या सभेला अपेक्षेने लोक येतात. त्यांना भूलथापा मारण्यापेक्षा कामाचं काहीतरी बोला ना...