मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीकडून चुकीची आणि खोटी जाहिरात केली जात आहे. शेतकरी कर्जमाफीबाबतची ही खोटी जाहिरात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून, या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे.शेतकरी सन्मान योजनेबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी, शेकाप, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रिपाइं (गवई) या पक्षांच्या महाआघाडीतर्फे प्रसार माध्यमांवर एक जाहिरात प्रसारित केली जात आहे. कर्जमाफी म्हणून शासनाने दहा रुपयांचा चेक पाठविला, असे या जाहिरातीतील शेतकऱ्याची पत्नी म्हणते. अशाप्रकारे दहा रुपये कुणालाच पाठविले गेले नाहीत. या योजनेत त्याहून अधिक रकमा त्या-त्या खात्यात पाठविल्या गेल्या. आघाडीची जाहिरात खोटा व जनतेची दिशाभूल करणारी आहे. शेतकऱ्यांमध्ये राजकीय हेतुपुरस्सर असंतोष निर्माण करणारा अपप्रचार यात आहे. त्यामुळे या धादांत खोट्या जाहिरातीबाबत आम्ही निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. चुकीच्या व खोट्या जाहिरातीच्या माध्यमातून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाने या सर्व पक्षांवर कार्यवाही करावी, अशी मागणीही तावडे यांनी केली.>‘राजू शेट्टी बांधावरचे शेतकरी’विशेष म्हणजे, या जाहिरातीत दहा रुपयांचा चेक दिल्याचे म्हटले आहे. कर्जमाफीची सर्व रक्कम थेट खात्यात आरटीजीएसने पाठविण्यात आली. शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी या महाआघाडीत असतानासुद्धा शेतकºयांना सरकारकडून पैसे चेकने गेले की आरटीजीएसने गेले, हेही यांना माहीत नाही. बहुधा हे बांधावरचे शेतकरी दिसत आहेत, प्रत्यक्ष शेतात राबणारे शेतकरी नाहीत, अशी टिप्पणीही तावडे यांनी केली.
आघाडीच्या जाहिरातीविरुद्ध भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 5:44 AM