निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या राजकीय अजेंड्याबाबत संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 05:56 AM2021-07-15T05:56:33+5:302021-07-15T05:57:25+5:30
Prashant Kishore : बिगरभाजप नेत्यांची भेट घेण्याचा सपाटा; काँग्रेसकडूनही चाचपणी
वेंकटेश केसरी
नवी दिल्ली : निवडणुकांचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिगरभाजप पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेण्याचा सपाटा लावला आहे. मंगळवारी त्यांनी काँग्रसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी व त्या पक्षाचे नेते राहुल गांधींची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचे प्रशांत किशोर सातत्याने टाळत आहेत. या घडामोडींमुळे त्यांचा नेमका राजकीय अजेंडा काय आहे याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
मूळचे बिहारचे रहिवासी असलेल्या प्रशांत किशोर यांनी २०१४ साली लोकसभा निवडणुकांत नरेंद्र मोदी यांच्यासमवेत काम केले होते. त्या निवडणुकांत भाजप विजयी झाला. निवडणूक जिंकण्यासाठी आखत असलेली रणनीती व ज्या पक्षासाठी काम करतात त्याला मिळालेले यश या दोन्ही गोष्टींमुळे काही राजकीय पक्षांनी प्रशांत किशोर यांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मोदींची साथ सोडल्यानंतर ते काही काळ जनता दल (यू) या पक्षात कार्यरत होते. त्यावेळेपासून प्रशांत किशोर बिगरभाजप पक्षांचे अत्यंत लाडके बनले. आता भाजपला रोखण्यासाठी ते उपयोगी ठरतात का याची चाचपणी राहुल व प्रियांका गांधी यांच्याकडून केली जात आहे.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांत तृणमूल काँग्रेसची सरशी झाली. त्या पक्षासाठी प्रशांत किशोर यांनी निवडणूक रणनीती आखली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही गेल्या काही दिवसांत तीनदा भेट घेतली होती. पुढील वर्षी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होईल. पंजाबमध्येही आगामी विधानसभा निवडणुका आहेत. २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका येतील. या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्याशी प्रशांत किशोर यांनी चर्चा केली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रशांत किशोर यांनी वायएसआर काँग्रेस, जनता दल (यू), द्रमुक यांनाही निवडणूक रणनीती आखून दिली होती. उत्तर प्रदेशच्या मागील विधानसभा निवडणुकांत त्यांनी काँग्रेससाठीही अशा प्रकारचे काम केले होते. प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसने जाहीर करावे तसेच ब्राह्मण मतदारांना आपल्या बाजूने वळवून घ्यावे असे प्रशांत किशोर यांनी सुचविले होते. मात्र निवडणुकांच्या आधी काँग्रेसने अचानक समाजवादी पक्षाशी युती करण्याचा निर्णय घेतला आणि बसपने त्यात खोडा घातला.
प्रादेशिक पक्षांचे किंगमेकर होण्याची महत्वाकांक्षा?
प्रशांत यांनी निवडणूक रणनीती तयार करावी याकरिता शिरोमणी अकाली दल, बसप, बिजू जनता दलाने त्यांना संपर्क साधल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे तसेच अरविंद केजरीवाल यांच्या आपशी, राष्ट्रवादीच्या युवा नेत्यांशी प्रशांत यांचे उत्तम संबंध आहेत. प्रशांत किशोर यांची खासदार बनण्याची इच्छा नाही. त्यांना प्रादेशिक पक्षांचे किंगमेकर बनण्याची महत्वाकांक्षा आहे असे राजकीय निरीक्षकांना वाटते.