Farmers Protest : "जोवर ताकद तोवर लढणार, १०० दिवस असो किंवा १००..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 06:44 PM2021-03-07T18:44:41+5:302021-03-07T18:46:55+5:30
Farmers Protest : कितीही वर्षे लागली तरी काँग्रेस आणि शेतकरी मागे हटणार नाही, प्रियंका गांधींचा इशारा
मेरठमधील सरधाना येथील केली या गावात रविवारी काँग्रेसकडून महापंचायत बोलावण्यात आली होती. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी या ठिकाणी जमलेल्यांना संबोधित केलं. "कृषी कायदे मागे घेण्यासाठी कितीही वर्षे लागली तरी काँग्रेस शेतकऱ्यांसोबत उभी राहिल. यासाठी १०० दिवस लागले किंवा १०० वर्षे लागली तरी शेतकरी आणि काँग्रेस मागे हटणार नाही," असं त्या म्हणाल्या.
"माझ्यात जोपर्यंत ताकद आहे तोवर मी लढणार. यासाठी मग १०० दिवस असो किंवा १०० वर्ष. संसदेत शेतकऱ्यांचा अपमान करण्यात आला. आंदोलनजीवी, परजीवी असा उल्लेख करून त्यांचा अपमान करणअयात आला. दिल्लीतील सीमेप्रमाणेच प्रत्येक गावागावात आंदोलन करा. जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा काँग्रेस तुमच्या पाठीशी उभी राहिल. सुख आणि दु:ख काहीही असो आम्ही तुमच्यासाठी कायम उभ असू. तुमची लढाई माझी आहे," असंही प्रियंका गांधी म्हणाल्या.
Do not lose hope, it has been 100 days. Even if it takes 100 weeks or 100 months, we will continue this fight with you till this government takes back its black laws: Congress leader Priyanka Gandhi Vadra during Kisan Mahapanchayat in Meerut pic.twitter.com/BvI4xDuxV4
— ANI UP (@ANINewsUP) March 7, 2021
'हम दो हमारे दो'चं सरकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनपासून पाकिस्तान सर्व ठिकाणी फिरून आले. 'हम दो हमारे दो' मित्र सरकार चालवत आहेत. जे प्रकर्षानं दिसूनही येत आहे. सरकारला तुमचं ऐकावंच लागेल. अशा माहोल तयार करा की सरकार तुमच्या सुनावणीशिवाय सरकार पुढे जाऊ शकणार नाही, असंही त्या म्हणाल्या.
ऊसाचीही थकबाकी
"उत्तर प्रदेशात ऊसाची १० हजार कोटी रूपयांची थकबाकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ हजार कोटी रूपयांना दोन विमानं विकत घेतली. संसदेच्या नव्या इमारतीसाठी पैसे खर्च करत आहे. थकबाकी देण्याऐवजी ते विमानं विकत घेत आहेत. तुमच्या विम्यामुळे हजारो रूपये अब्जाधीशांच्या खिशात गेले आहेत," असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मतांचं राजकारण नाही
"आमच्यासाठी हे मतांचं राजकारण नाही. आम्ही तुमचं देणं लागतो. तुम्ही अन्नदाते आहात. तुमची लढाई ही माझी लढाई आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत लढतच राहणार. यासाठी मग १०० दिवस लागतील किंवा शंभर महिने. जोपर्यंत सरकार हे काळे कायदे रद्द करत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.