Nashik Latest News: शहरातील चारपैकी एकाही मतदारसंघात काँग्रेस पक्षाला जागा सोडवून घेण्यात पक्ष नेतृत्वाला अपयश आले. त्यामुळे शहरात पक्षच संपून जाईल, अशी संतप्त भावना व्यक्त करत नाशिक शहरातील कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी रोडवरील पक्ष कार्यालय असलेल्या काँग्रेस भवनलाच कुलूप ठोकले.
24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. त्यानंतरही कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी आंदोलकांशी संपर्क साधला नाही की त्यांचा फोनदेखील उचलला नाही, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, नाशिकला जागा सोडणे शक्य नसल्यास मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी दिल्लीत ठाण मांडला असून शुक्रवारी (दि.२५) पक्षाच्या बैठकीत यासंदर्भात काही तरी निर्णय होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नाशिक सांगितले.
नाशिक शहरात काँग्रेस पक्षाने किमान मध्य नाशिक ही अत्यंत सोयीची जागा सोडावी, असा आग्रह धरला होता. मात्र नाशिक शहरातील चारपैकी एकही जागा न मिळाल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यामुळे गुरुवारी (२४ ऑक्टोबर) कार्यकर्त्यांनी दुपारी बारा वाजता कार्यकर्त्यांनी जमून काँग्रेस भवनाला कुलूप लावले.
यावेळी काँग्रेस पक्षाला एकही जागा न सोडणाऱ्या नेत्यांचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस पक्षाला नाशिक जिल्ह्यात जेमतेम दोन जागा मिळत आहेत. नाशिक शहरात चारपैकी किमान मध्य नाशिक ही जागा मिळणे अपेक्षित होते.
दलित, मुस्लीमबहुल मतदारसंघ असल्याने यंदा काँग्रेस पक्षाला अत्यंत अनुकूल वातावरण होते. मात्र, असे असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या वाटाघाटीत ही जागा उद्धवसेनेला सोडण्यात आली. पक्षाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि इच्छुकदेखील याबाबत अनभिज्ञ होते.
उद्धवसेनेच्या उमेदवारांना उमेदवारी घेण्यासाठी निमंत्रित केल्यानंतर ही जागा उद्धवसेनेला सोडली गेल्याचे कळले. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नेत्यांना मोबाइलवर कॉलही केले. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याने गुरुवारी दुपारी हे आंदोलन करावे लागल्याचे सुरेश मारू यांनी सांगितले.