पुण्यात दोन दिवस राजकीय धुळवडीचे : रथी महारथी लावणार हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 05:01 PM2019-02-07T17:01:05+5:302019-02-07T17:04:52+5:30
लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेतही पुणेकरांनी भाजपला साथ दिली आणि तोच निकाल महापालिका निवडणुकात कायम दिसला. त्यामुळे भाजपला गड राखण्यासाठी आणि इतराना अस्तित्व टिकवायला पुण्याचे आव्हान आहे.
पुणे : सध्या शत-प्रतिशत भाजपचे राज्य असलेल्या पुणे शहरात इतर राजकीय पक्ष अस्तित्व टिकवण्यासाठी लढताना दिसत आहे. लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेतही पुणेकरांनी भाजपला साथ दिली आणि तोच निकाल महापालिका निवडणुकात कायम दिसला. त्यामुळे भाजपला गड राखण्यासाठी आणि इतराना अस्तित्व टिकवायला पुण्याचे आव्हान आहे. याच कारणामुळे येणाऱ्या काही महिन्यात शहरात अनेक नेत्यांच्या वाऱ्या, उदघाटनांचे कार्यक्रम, प्रशिक्षण शिबिरे यांची रेलचेल दिसणार आहे.
याची सुरुवातही झाली असून येत्या शुक्रवार आणि शनिवारी शहरात भाजप आणि काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते पुण्यात असणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे कार्यकर्त्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यासाठी तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण जनसंघर्ष सभेसाठी पुण्यात असणार आहेत. त्यामुळे उद्या आणि परवाचा दिवस राजकीय वक्तव्य आणि घडामोडींनी भरलेला असेल यात शंका नाही.शहा पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्याच्या क्लुप्त्या सांगणार असून काँग्रेसतर्फे मात्र जनसंघर्ष यात्रेपाठोपाठ सभा घेण्यास पुण्यापासून सुरुवात केली जाणार आहे. अर्थात लोकसभेची जागावाटणी पूर्ण झाली नसल्याचे काँग्रेसची सभा म्हणजे शक्ति प्रदर्शन असल्याचे म्हटले जात आहे.
मागील आठ्वड्यात राष्ट्रवादीने घेतलेल्या सभेनंतर काँग्रेसची सभा कशी होणार याविषयी उत्सुकता आहे. दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत वातावरण दिसते तेवढे आलबेल नसल्यामुळे अंतर्गत भांडणांची आणि तक्रारींची दखल शहा घेणार का असाही सवाल आहे. शिवाय दोनही पक्षात निवडणूक लढवण्यापासून ते उमेदवार कोण असणार अशा सर्व मुद्द्यांवर साशंकता असल्यामुळे या कार्यक्रमांना महत्व प्राप्त झाले आहे.