- अतुल कुलकर्णी
मुंबई : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगरच्या जागेचा निर्णय घेण्यास विलंब केल्यामुळे नगर सोबतच, अमरावती, रावेर, औरंगाबाद या जागांचे घोडे अडून बसले आहे. दोन वर्षे आधी डॉ. सुजय विखे नगरमधून निवडणूक लढवण्याची तयारी करत होते मात्र त्यावर निर्णय घेण्यास दोन्ही बाजूंनी विलंब झाला परिणामी ते भाजपाच्या वाटेवर निघून गेले. या एका गोष्टीमुळे पुढच्या अनेक जागांचे निर्णय अजूनही लटकलेलेच आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुजय राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटण्यासाठी गेले, तेव्हा अजित पवार दौऱ्यावर होते. तर आ. जयंत पाटील यांनी दोन दिवसात निर्णय घेऊ, थोडे थांबा, असे सांगितले. मात्र हे आपल्याला फिरवत तर नाहीत ना या विचाराने सुजय यांनी तेथून जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतली. ते कळताच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अहेमद पटेल यांना फोन करुन सांगितले की आम्ही सुजयला राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे करण्यास तयार आहोत. तेथून निरोप मुंबईत येईपर्यंत महाजन यांनी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेले होते.
औरंगाबाद आणि अहमदनगर या दोन जागांची अदलाबदली करण्यास आपण तयार आहोत असेही काँग्रेसने कळवले होते. मात्र तो निर्णय अंमलात आला नाही तेव्हा राष्ट्रवादीने अमरावती व औरंगाबादची अदलाबदल करुन मागितली. मात्र त्यावर काल मंगळवारी रात्रीपर्यंत काँग्रेसकडून कोणतेही उत्तर आले नाही. त्याच काळात नवनीत कौर राणा जाऊन शरद पवारांना भेटल्या. तेव्हा आम्ही तुम्हाला पाठींबा देऊ, मात्र दोन दिवस वाट पहावी लागेल, काँग्रेसचा निरोप काय येतो ते पाहू असे त्यांना आज सांगण्यात आले आहे. मात्र राणा पतीपत्नी आणि शरद पवार यांच्या बैठकीचा सूर ओळखून नवनीत राणा यांनी आपल्याला पवारांनी पाठींबा देऊ केला असे जाहीर करुन टाकले आहे.
त्याआधी अमरावतीची जागा मुकूल वासनिक यांच्यासाठी आम्ही देतो, त्यांना निवडूनही आणू असा प्रस्ताव स्वत: खा. सुप्रिया सुळे यांनी दिला होता. वासनिक आणि अहेमद पटेल यांच्यातही यावर चर्चा झाली होती पण त्यावर निर्णय घेण्यास काँग्रेसने वेळ लावला परिणामी त्यासाठी आता नवनीत कौर पाठींबा मागत आल्या.
ही चर्चा चालू असताना औरंगाबादच्या बदल्यात आम्हाला उस्मानाबादची जागा शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासाठी द्या, अशी मागणी काँग्रेसने केली. पण ती जागा जगजितसिंह राणा पाटील यांच्यासाठी सोडल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले. परिणामी त्या जागेचाही विषय मागे पडला. त्यामुळे आता औरंगाबाद आणि रावेरच्या जागेची अदलाबदल करु असा नवा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून काँग्रेसला देण्यात आला आहे. रावेरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. तेथून काँग्रेसने उल्हास पाटील यांना उमेदवारी दिल्यास ती जागा जिंकण्याची शक्यता जास्त आहे असे सांगण्यात आले आहे तर मिळालेल्या माहितीनुसार पाटील यांना तयारीला लागा असा संदेश प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे अद्यापही काही जागांची नावे जाहीर करता येत नाहीत असे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
नवनीत कोर राणा शरद पवार भेटीत काय घडले नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी खा. शरद पवार आणि खा. प्रफुल्ल पटेल यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. नवनीत कौरसाठी उमेदवारी दिल्यास आम्ही विजय मिळवून देऊ असे त्या दोघांनीही पटवून दिले. मात्र अमरावतीची जागा कोणी लढवायची यावर अद्याप दोन्ही काँग्रेसमध्ये एकवाक्यता न झाल्यामुळे याचा निर्णय झाल्यावरच भूमिका स्पष्ट होईल असेही जयंत पाटील म्हणाले. खा. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके उपस्थित होते. मात्र त्यांची आणि राणा पतीपत्नींची भेट झाली नाही. यावर खोडके यांना विचारले असता ते म्हणाले, मी माझी भावना शरद पवार यांना भेटून स्पष्ट केली आहे. त्यावर मी माध्यमांमध्ये काही बोलणार नाही.
२६ वर्षानंतर आ. अनील गोटे - शरद पवार भेटआ. अनिल गोटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. भूजबळ आणि तेलगी प्रकरणानंतर गोटे यांची ही तब्बल २६ वर्षानंतर पवारांची भेट होती. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, आज माझा शत्रू वेगळा आहे, कोणत्याही परिस्थितीत मला केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांना पराभूत करायचे आहे म्हणून मी पवारांची भेट घेतली असे नंतर गोटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. आमच्यात जवळपास २० ते २५ मिनीटे बोलणे झाले. त्यांनी राजकीय परिस्थिती विचारली. त्यांनी जे विचारले ते मी सांगितले. काँग्रेसने आ. कुणाल रोहीदास पाटील यांना धुळे लोकसभेची उमेदवार दिली आहे. जर भामरेंचा पराभव करायचा असेल तर मत विभागणी झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, नुसती मी मदत करुन ते होणार नाही, त्यामुळे मी स्वत: धुळ्यातून उभा राहणार आहे. त्यामुळे मतांचे विभाजन होईल असेही पवारांना पटवून दिल्याचे गोटे यांनी सांगितले.
राज ठाकरेंच्या भेटीचे राजमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी अचानक शरद पवार यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. गुप्त ठेवण्यात आलेल्या बैठकीच्या बातमीला पवारांच्या बंगल्यावरील एका नेत्याने पाय फोडले. काही चॅनलचे पत्रकार तेथे गेले असताना थोडा वेळ थांबा, आणखी दोन मोठे नेते पवारांना भेटण्यास येणार आहेत असे त्या नेत्याने सांगितले. थोेड्याबेळातच राज तेथे आले. मात्र माध्यमांना पाहून त्यांनी थोड्यावेळातच बैठक आटोपली. येत्या काळात राज ठाकरे कोणकोणत्या शहरात प्रचाराच्या सभा घेणार, त्यासाठीचे नियोजन करण्यासाठी ही बैठक असल्याचे सुत्रांनी सांगितले. दुसरे एक बडे नेते राज तेथून गेल्यानंतर येणार होते पण माध्यमांचे प्रतिनिधी तेथे पाहून त्यांनी आपला बेत बदल्याचे समजले. यावर विचारले असता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा देशातून पराभव का व्हावा हे राज ठाकरे यांनी चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला सांगितले आहे. काही लोकांमध्ये कला असतात आणि त्याचा आपण आदर केला पाहिजे. त्यांनी माझी हुबेहुब नक्कल केली होती. त्यावर मी त्यांचे आभार मानले होते. राजकारणात कोणावर रागावून जमत नाही असेही पाटील यावेळी म्हणाले.