नऊ महिन्यांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या नेत्याला काँग्रेसनं 'चुकून' महासचिव केलं; अन्...
By कुणाल गवाणकर | Published: December 23, 2020 10:37 AM2020-12-23T10:37:51+5:302020-12-23T10:40:28+5:30
काँग्रेसवर ओढवली नामुष्की; पक्षावर नियुक्ती रद्द करण्याची वेळ
भोपाळ: मध्य प्रदेशातील युवक काँग्रेसला वेगळ्याच नामुष्कीला सामोरं जावं लागलं आहे. नऊ महिन्यांपूर्वी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात गेलेल्या एका नेत्याची नियुक्ती काँग्रेसनं महासचिवपदी केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. याबद्दलची चर्चा रंगल्यावर काँग्रेसनं लगेचच संबंधित नेत्याची नियुक्ती रद्द केली.
मध्य प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिवपदी हर्षित सिंघई यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर हर्षित यांना अनेकांनी अभिनंदनाचे फोन केले. यामुळे हर्षित यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण हर्षित यांनी मार्च महिन्यात काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हर्षित यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत पक्ष सोडला आणि कमळ हाती घेतलं. मात्र काँग्रेसनं त्यांच्याकडे असणारा रेकॉर्ड अपडेट केला नाही. त्यामुळे आता काँग्रेसला नामुष्कीचा सामना करावा लागला आहे.
भाजपचा 'आनंदी' शेतकरी करतोय आंदोलन; आता भाजपलाच नोटीस पाठवणार
युवक काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक शुक्रवारी संपली. यामध्ये हर्षित सिंघई यांची १२ मतानं महासचिवपदी निवड झाली. त्यानंतर हर्षित यांना अभिनंदनाचे फोन येऊ लागले. हा संपूर्ण प्रकार अतिशय हास्यास्पद असल्याचं सिंघई म्हणाले. 'या निवडणुकीत कोणालाही रस राहिलेला नव्हता. युवक काँग्रेसनं माझी महासचिव म्हणून निवड केली. पण मी १० मार्चलाच ज्योतिरादित्य सिंधियांसोबत काँग्रेस पक्ष सोडला आहे,' असं सिंघई यांनी सांगितलं.
J&K DDC Result: जम्मूमध्ये भाजपा बनला सर्वात मोठा पक्ष; तरीही गुपकार युती आघाडीवर
'काँग्रेसमध्ये असताना मी तीन वर्षांपूर्वी महासचिव पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यानंतर पक्षानं वारंवार निवडणूक घेणं टाळलं. आधी २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीमुळे, त्यानंतर २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे संघटनात्मक निवडणूक टाळण्यात आली. मी सिंधियांसोबत काँग्रेस सोडताना माझा उमेदवारी अर्ज रद्द करा, असं पक्षाला सांगितलं होतं. त्यासाठी मी दोनदा फोन केले. त्यानंतर मला पक्ष सोडण्याचं कारण मेल करण्यास सांगितलं. मी कमलनाथ आणि राहुल गांधींना तसा मेलदेखील केला. पण त्यानंतरही काँग्रेसनं रेकॉर्डमध्ये बदल केला नाही. अनेक ठिकाणी काँग्रेसनं हेच केलं आहे. विविध पदांवर पक्ष सोडून गेलेल्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत,' असं सिंघई म्हणाले.