- नितिन पंडीत
भिवंडी : काँग्रेसच्याठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी दयानंद चोरघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी सायंकाळी उशिराने चोरघे यांची काँग्रेसच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. चोरघे यांच्या नियुक्तीने ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मान्यतेने व प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या शिफारशीने शुक्रवारी राष्ट्रीय महासचिव वेणूगोपाल यांनी महाराष्ट्रातील १४ नवे जिल्हा अध्यक्ष जाहीर केले असून दयानंद चोरघे यांच्यावर ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दयानंद चोरघे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी भाजपच्या प्रदेश सचिव पदाचा त्याग करून काँग्रेसमध्ये घरवापसी केली होती, तेव्हापासून तेच अध्यक्ष होतील अशी चर्चा होती.
चोरघे यांनी सामाजिक भान जपत आपल्या डी वाय फाउंडेशन या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. कोरोना काळात देखील त्यांनी अनेकांना मदतीचा हात देत गरीब व गरजूंना आर्थिक मदत व अन्नधान्य पुरवून लोकांना आधार दिला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकींसह लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असून मरगळ आलेल्या काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्याचे काम चोरघे यांना करावे लागणार आहे. दरम्यान काँग्रेस संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मला अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
एक बूथ दहा युथ ही संकल्पना घेऊन मी काम करणार असून प्रदेश अध्यक्ष नाना पटोले,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्ष प्रमुख नेते यांना सोबत घेऊन मी पक्ष संघटन वाढविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असून आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिली आहे.