"दहा लाखांचा सूट घालून गांधीजींचे नाव घेणे हाच मुळात विरोधाभास"; काँग्रेस प्रभारींची पंतप्रधानांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 02:32 AM2020-10-15T02:32:54+5:302020-10-15T06:47:54+5:30
महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष चौथ्या नंबरवर गेलाच कसा, हा माझ्यापुढे प्रश्न आहे. मी आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहात आहे. मात्र, आम्हाला खूप काम करावे लागेल. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणार - एच के. पाटील
अतुल कुलकर्णी
मुंबई : ‘साधी राहणी उच्च विचार’ या महात्मा गांधींच्या विचाराला आणि साधेपणाला देशाने गौरवले. आपण त्यांना राष्ट्रपिता म्हणतो. सामान्य माणूस त्यांच्या जवळ सहजपणे जाऊ शकत होता. एक धोती आणि पंचा घालून फिरणाऱ्या या साध्या माणसाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा लाखाचा सट घालून फिरतात. ही देशाला शोभा देणारी गोष्ट नाही, असा
थेट हल्ला काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी एच. के. पाटील यांनी केला आहे.
‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, महात्मा गांधींच्या आयुष्याशी तुलना करताना जाणवणारा हा मोठा विरोधाभास आहे. आम्ही ‘स्वच्छ भारत अभियानात’ गांधीजींचा चष्मा वापरतो. त्यांच्या काठीचाही वापर प्रतीकात्मकरीत्या करतो. कृती मात्र भलतीच करतो. हा मोठा विरोधाभास आहे.
‘स्वच्छ भारत अभियान’ हा काही नवीन कार्यक्रम नाही. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘निर्मल भारत’ची कल्पना मांडली. त्यात मोठे काम केले. पण मोदी सरकारने पुढे त्याचे नाव बदलून ‘स्वच्छ भारत अभियान’ केले. नाव बदलले तरी चालेल पण देशात त्यासाठी काम झाले पाहिजे. कर्नाटकात ग्रामविकास आणि पंचायत राज या विभागाचे मंत्री असताना आपल्याला सलग चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार
मिळाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्रामीण विकासाला आपण पुरस्काराच्या कोणत्या टप्प्यावर बघता?
ग्रामीण विकासासाठी सुरुवातीला जी कामे झाली, ती योग्य होती. मात्र पुढे ग्रामीण विकासाचा संपूर्ण फोकस बदलला. ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांना केंद्राने जो निधी द्यायला पाहिजे होता, तो दिला नाही. अनेक योजनांना मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे जे काम व्हायला हवे होते ते ही झाले नाही.
केंद्र सरकारने काँग्रेसच्या विफलतेचे प्रतीक म्हणून मनरेगा योजना चालू ठेवणार, असे सांगितले होते. आज त्याच मनरेगासाठी केंद्राने लॉकडाऊन नंतर चाळीस हजार कोटीची तरतूद केली. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
मनरेगा हा केवळ देशाचा नाही तर जगाने कौतुक करावे असा मोठा कार्यक्रम आहे. जगभरात मनरेगाची वेगवेगळ्या पद्धतीने कॉपी केली गेली. कोणीही जगात आजपर्यंत या कार्यक्रमावर टीका केली नाही. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्या कल्पनेतून आम्ही मनरेगा ला आकाराला आणले होते. ग्रामीण विकास हे आमचे स्वप्न होते. अभिमानाने लक्षात ठेवावी, अशी मनरेगाची योजना आहे. त्यावर टीका करण्यापेक्षा ती चांगल्या पद्धतीने राबवली पाहिजे.
महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्षपद बदलण्याचा विषय चर्चेत आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील ती भूमिका घेतली आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष व्हायला आवडेल असे सांगितले आहे. यावर निर्णय कधी होणार?
प्रदेशाध्यक्षपदाचा विषय अनेकांनी माझ्या लक्षात आणून दिला आहे. मी पुढच्या वेळी मुंबईत येईन तेव्हा महाराष्ट्रातल्या नेत्यांशी चर्चा करेन. त्यांची मतं समजून घेईन. त्यानुसार वरिष्ठांशी चर्चा करेन आणि त्यावर तात्काळ निर्णय घेतला जाईल.
महाराष्ट्रात काँग्रेस चौथ्या नंबर वर आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नाही. कार्यकर्त्यांपेक्षा नेते जास्त दिसत आहेत. मुंबई काँग्रेस पूर्णपणे अस्तित्वहीन झाली आहे. या प्रश्नांना आपण कसे तोंड देणार?
महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष चौथ्या नंबरवर गेलाच कसा, हा माझ्यापुढे प्रश्न आहे. मी आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहात आहे. मात्र, आम्हाला खूप काम करावे लागेल. कोणीतरी हरला म्हणून मी जिंकलो ही वृत्ती सोडून द्यावी लागेल. कार्यकर्त्यांना कार्यक्रम द्यावे लागतील. त्यासाठी मेहनत करावी लागेल. महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. हे काम येत्या काही महिन्यात वेग घेताना दिसेल.
कर्नाटक आणि महाराष्ट्रात जलसिंचनावरून काही वादाचे मुद्दे आहेत. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून मतभिन्नता आहे. यावर आपली भूमिका काय असेल?
कर्नाटक महाराष्ट्रात जास्त वादाचे मुद्दे राहिलेले नाहीत. बच्छावत अॅवॉडनंतर जवळपास सगळे मुद्दे संपले आहेत. अलमट्टी धरणाच्या उंची विषयी बच्छावत अवॉर्ड आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यात बदल होणार नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटकचे सलोख्याचे संबंध राहिले आहेत. पाणीप्रश्नावर आमचे वाद आंध्रप्रदेश आणि तेलंगणासोबत आहेत.