चंदीगड : शेतकरी आंदोलनामुळे हरयाणातील राजकारण चांगलेच तापले आहे. हरयाणातील खट्टर सरकार धोक्यात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. अनेक भाजपा आणि जेजेपीचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. हरयाणाच्या खट्टर सरकारचे असे अनेक आमदार आहेत, जे वास्तव पाहात असून आमच्या संपर्कात आहेत. ज्यावेळी परिस्थिती येईल, त्यावेळी संविधान पाहून हरयाणामध्ये काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करू शकते, असे हरयाणा काँग्रेसच्या अध्यक्षा कुमारी शैलजा यांनी सांगितले.
आज जी परिस्थिती उद्भवली आहे, त्या परिस्थितीत बरेच आमदार त्याचे वास्तव जाणून घेत आहेत. मग ते सत्ताधारी पक्षातील असो किंवा सहयोगी किंवा अपक्ष, असे कुमारी शैलजा म्हणाल्या. तसेच, असे अनेक आमदार आमच्याशी बोलून आपली नाराजीही व्यक्त करत आहेत. पुढील परिस्थिती पाहून काँग्रेस निर्णय घेईल, असे कुमारी शैलजा यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षांच्या या दाव्यावर हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, आमदार कोणाच्या संपर्कात आहेत, हे सर्वांना माहीत आहे. मला एवढेच सांगायचे आहे की, काँग्रेसने आपल्या आमदारांविषयी सावधगिरी बाळगली पाहिजे.
शेतकरी आंदोलनादरम्यान भाजपा आणि जेजेपीच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत भाजपा-जेजेपीच्या नेत्यांनी अमित शहा यांना आश्वासन दिले की राज्यातील मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत अविश्वास ठराव आणला तरी युती सरकार सुरक्षित राहील.
मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी अमित शहा यांच्याशी झालेल्या एक तासाच्या बैठकीनंतर सांगितले होते की, हरयाणामधील राजकीय वातावरण एकदम ठीक आहे. राज्यात राजकीय चर्चा चालू होत्या, त्यात काही अर्थ नाही. युती सरकार पूर्ण विश्वासाने जात आहे आणि आपला कार्यकाळ पूर्ण करेल.