काँग्रेसचा नवा नारा ‘जय श्री राम’; अयोध्येतील मंदिर निर्माणासाठी पैसे देण्याचं लोकांना आवाहन
By प्रविण मरगळे | Published: January 13, 2021 09:41 AM2021-01-13T09:41:08+5:302021-01-13T09:43:00+5:30
राजीव गांधी यांनी राम मंदिराचं कुलूप तोडून लोकांना दर्शनासाठी खुलं केले होते, आता अयोध्येतील हे भव्य मंदिर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने बनत आहे.
भोपाळ – अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी काँग्रेसनं आता पुढाकार घेतला आहे, मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा पार पडला होता, भाजपानं राम मंदिराचं श्रेय घेत लोकांकडून वर्गणी जमा करण्यास सुरूवात केली, त्यापाठोपाठ आता राम मंदिर बांधकामासाठी भोपाळ काँग्रेसनं पैसे गोळा करण्यास सुरूवात केली आहे.
माजी मंत्री पीसी शर्मा यांच्या नेतृत्त्वात भोपाळमध्ये याची सुरूवात झाली, न्यू मार्केटस्थित हनुमान मंदिरात पूजा करून काँग्रेस नेत्यांनी राम मंदिरासाठी लोकांकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. राम मंदिर निर्माणाचं स्वप्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं होतं असं पीसी शर्मा म्हणाले.काँग्रेस नेत्यांनी पैसे थेट राम मंदिर ट्रस्टच्या खात्यात जमा करण्याचंही आवाहन केले आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस नेत्यांनी पोस्टर्स छापले आहेत. त्यात राम मंदिर ट्रस्टचा खाते क्रमांक दिला आहे.
माजी मंत्री पीसी शर्मा यांनी न्यू मार्केटमध्ये नेत्यांना आवाहन करत होते की, तुम्ही कोणीही लोकांकडून पैसे गोळा करू नका तर थेट जी रक्कम असेल ती राम मंदिर ट्रस्टच्या खात्यात जमा करा. त्यामुळे या व्यवहारात पारदर्शकता येईल. याआधीही राम मंदिर निर्माणासाठी अनेकांनी पैसे जमा केले होते परंतु त्या पैशाचा हिशोब कुठे आहे असा अप्रत्यक्ष टोला पीसी शर्मा यांनी भाजपाला लगावला आहे. त्यामुळे लोकांकडून मिळणारे पैसे थेट ट्रस्टच्या खात्यात जमा करावे असं ते म्हणाले.
होइहि सोइ जो राम रचि राखा।
— P C Sharma (@pcsharmainc) January 12, 2021
को करि तर्क बढ़ावै साखा॥
आज न्यू मार्केट में स्थित रामभक्त हनुमान जी के मंदिर में पूजा अर्चना कर प्रभु श्रीराम के भव्य मंदिर के निर्माण हेतु लोगों से सीधे बैंक एकाउंट में दान देने की अपील की॥ pic.twitter.com/yvmmyg0PMr
त्याचसोबत राजीव गांधी यांनी राम मंदिराचं कुलूप तोडून लोकांना दर्शनासाठी खुलं केले होते, आता अयोध्येतील हे भव्य मंदिर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने बनत आहे. काही भ्रष्ट लोकांकडे पैसा जाऊ नये यासाठीच मंदिर ट्रस्टच्या खात्यात रक्कम जमा करावी, मध्य प्रदेशात राम मंदिर निर्माणासाठी विश्व हिंदू परिषदेकडूनही निधी गोळा करण्याचं काम सुरू आहे. यावेळी अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग घडले, अशा लोकांना पैसे देऊ नये असं काँग्रेसने सांगितले आहे. लोकांमध्ये याबाबत जागरूकता आणून थेट राम मंदिर ट्रस्टच्या खात्यावर पैसै जमा करण्याचं आवाहन काँग्रेसकडून केले जात आहे.