मुंबई - परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्यातील या घटनेवरुन आज संसदेत चांगलाच गदारोळ पाहायला मिळाळा. भाजपासह इतरही काही पक्षांच्या खासदारांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलीय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. या दाव्यानंतर भाजपा नेत्यांनी अनिल देशमुख यांचं जुनं ट्विट नव्याने शेअर करत शरद पवार खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
"सत्ता गेल्यानंतर मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस" असं म्हणत काँग्रेसने निशाणा साधला आहे. "भाजपाच्या 22 मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप होते, कोणी राजीनामा दिला?" असा सवाल विचारत काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे (Dr. Raju Waghmare) यांनी भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच "15 फेब्रुवारी रोजी प्रेस झाली परंतू हॉस्पिटलच्या परिसरात देशमुखांना डिस्चार्ज मिळाल्यावर! खोटे बोलून संभ्रम तयार करायचा! सत्ता गेल्यानंतर काही माणसांचे मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस व भाजप नेते कृपा करून तपासून घ्या" असं वाघमारे यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "वनमंत्री संजय राठोड यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांना तातडीने पायउतार व्हावे लागले. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आरोप केल्यानंतरही त्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही?" या भाजपच्या ट्विटवर राजू वाघमारेंनी उत्तर दिलं आहे. "भाजपाच्या 22 मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप होते कोणी राजीनामा दिला? अमित शहाच्या काळात पुलवामा घडले शहांनी राजीनामा दिला का? भाजपाच्या सर्व मंत्र्यांचे न्यायाधीश फडणवीस कसे झाले होते? भाजपाने 2014 पासून त्यांच्या खडसे सोडून कोणत्या मंत्र्यावर आरोप झाल्यावर चौकशी लावली?" असं म्हटलं आहे.
"परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब फुसका! फेब्रुवारीत सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची शंका! आणि भेट जरी झाली तरी 100 कोटींच्या वसुलीची बातमी खरी कशी? फक्त अधिकारी पत्र देतो म्हणून मंत्री राजीनामा देणार? गुन्हा हा जिलेटीन कार आणि मनसुख हिरेन मृत्यू तपास भरकटवून सिंग! आता भाजपा स्वतःचे तोंड काळे करतील का?" असं देखील राजू वाघमारे यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांचे 15 फेब्रुवारीचे ट्विट रिट्विट केलंय. तसेच, 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद झाली होती. हे नेमके कोण? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे.