आम्हाला विचारलंच नाही! 'त्या' निर्णयावर काँग्रेस नाराज; ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 01:40 PM2021-05-26T13:40:58+5:302021-05-26T13:41:24+5:30
काँग्रेसचे नेते लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार; नाराजी व्यक्त करणार
मुंबई: पदोन्नतीतील आरक्षण एकाएकी रद्द करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसनं पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला विचारत न घेता आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्या मंत्र्यांनीदेखील आम्हाला हेच सांगितलं. पदोन्नतीतील आरक्षणाचं धोरण सरकारनं ठरवावं. यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.
...तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळाचं पाणी दिलं असतं; नारायण राणे यांचा मिश्किल टोला
पदोन्नतीतील आरक्षणाचं धोरण राज्य सरकारनं ठरवावं. यासाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ द्यावी असा आग्रह आम्ही धरला आहे. या प्रश्नी मुख्यमंत्र्याशी चर्चा करू. त्यानंतर आमची भूमिका ठरवू, असं पटोले म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ देण्याचं मान्य केलं होतं. मात्र तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी त्यांना कोकणात जावं लागलं. त्यामुळे आमच्या भेटीला विलंब झाला, असं पटोलेंनी सांगितलं.
उजनीच्या पाण्याचा संघर्ष पेटला; शरद पवार, अजित पवारांच्या घराची सुरक्षा वाढवली, पोलीस सतर्क
मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. या भेटीतून मार्ग निघेल. समस्येचं निराकरण होईल अशी अपेक्षा आहे. पदोन्नतीतील आरक्षण रद्द होण्याचं मूळ देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात आहे. फडणवीस सरकारनं केलेल्या दिरंगाईमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली. सर्वांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे. या भूमिकेतूनच काँग्रेसनं देश उभा केला आहे. मात्र काही जण आता तोच देश विकत आहेत, असं म्हणत पटोलेंनी भाजपला टोला लगावला. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास काँग्रेस वेगळा विचार करणार का, सत्तेतून बाहेर पडणार का, या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं.