काँग्रेसने ठेवली होती जेम्स बाँडप्रमाणे इतरांवर पाळत, मुख्तार अब्बास नक्वी यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 08:36 AM2021-08-02T08:36:54+5:302021-08-02T08:37:34+5:30
politics News: पेगासससारख्या धादांत खोट्या प्रकरणावरून काँग्रेस गोंधळ माजवून संसदेचा वेळ वाया घालवत आहे, असा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस जेव्हा केंद्रात सत्तेत होती, त्यावेळी जेम्स बाँडप्रमाणे इतरांवर पाळत ठेवत होती. आता पेगासससारख्या धादांत खोट्या प्रकरणावरून काँग्रेस गोंधळ माजवून संसदेचा वेळ वाया घालवत आहे, असा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे.
नक्वी म्हणाले की, संसदेत कोणत्या विषयांवर चर्चा करायची याची कार्यक्रम पत्रिका ठरलेली आहे. धादांत खोट्या विषयांवर संसदेत चर्चा करण्याची काहीही आवश्यकता नाही. कोरोना स्थिती, शेतकऱ्यांबाबतच्या चर्चेबद्दलही विरोधकांनी धरसोडीचे धोरण स्वीकारले. देशात विविध ठिकाणी पूर आला आहे. त्याबाबत तसेच महागाईबद्दल संसदेत चर्चा व्हावी, असे विरोधकांना वाटत नाही. पेगासस प्रकरणाबाबत केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत निवेदन केले होते.
पितळ उघडे पडले
केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, राफेल विमाने खरेदी प्रकरणावरूनही काँग्रेसने जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आताही हा पक्ष संसदेचा वेळ वाया घालवत आहे. मात्र, प्रत्येक वेळी काँग्रेसचे पितळ उघडे पडले आहे. यूपीए सरकारच्या कारकीर्दीत त्यांच्याच वित्तमंत्र्यांवर पाळत ठेवली जात होती. तसा आरोप या मंत्र्यांनी केला होता याची आठवणही नक्वी यांनी करून दिली.