Opinion Poll: पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये उमलणार कमळ; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 08:54 PM2019-04-08T20:54:29+5:302019-04-08T20:55:57+5:30
लोकसभा निवडणुकीची रंगत वाढत असतानाच आता टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरनं सर्व्हे केला आहे.
गांधीनगरः लोकसभा निवडणुकीची रंगत वाढत असतानाच आता टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरनं सर्व्हे केला आहे. या सर्व्हेतून भाजपाला गुजरातमध्येही धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागा असून, गेल्या वेळी भाजपानं सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. परंतु यंदा चित्र काहीसं बदललेलं पाहायला मिळणार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्येही भाजपाला फटका बसणार आहे. भाजपाच्या 4 जागा घटणार आहेत. त्यामुळे यंदा भाजपाला 22 जागांवरच समाधान मानावं लागू शकतं. गेल्या वेळी म्हणजेच 2014च्या निवडणुकीत भाजपाला 59.1 टक्के मतं मिळाली होती, तर काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 32.2 एवढी होती. परंतु यंदा भाजपाच्या मतांची टक्केवारी घटणार असून, त्याचा लाभ काँग्रेसला होणार आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 51.37, तर काँग्रेसला 39.5 टक्के मत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच याचा फटका बसून भाजपाच्या 4 जागा घटणार आहेत.
तर दुसरीकडे गुजरातमध्ये सध्या 9.5 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीचा इतिहास लक्षात घेतल्यास, 1962 मध्ये बनासकांठामधून जोहरा चावडा निवडून आल्या होत्या. त्यानंतर 1977 मध्ये दोन मुस्लिम उमेदवार निवडून आले. अहमद पटेल (भरुच) आणि एहसान जाफरी (अहमदाबाद) अशा दोन उमेदवारांवर जनतेनं विश्वास दाखवला. एकाच निवडणुकीत दोन मुस्लिम खासदार निवडून देण्याची गुजरातची ही पहिली आणि शेवटची वेळ होती.
गुजरात भाजपासाठी हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे. या राज्यात भाजपानं कधीही मुस्लिम उमेदवार दिला नाही. काँग्रेसनं 2014 पर्यंत राज्यात 15 मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले. यावेळी काँग्रेसनं फक्त भरुचमधून मुस्लिम उमेदवार दिला आहे. भरुच मतदारसंघात मुस्लिमांचं प्राबल्य आहे. या मतदारसंघात 15.64 लाख मतदार आहेत. यातील 22 टक्के मतदार मुस्लिम आहेत. तर अहमदाबाद पश्चिममध्ये 25 टक्के मुस्लिम मतदार आहेत. गांधीनगरमधील जुहापुरामध्येदेखील मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. यंदा गांधीनगरमधून भाजपाचे अध्यक्ष अमित शहा निवडणूक लढवत आहेत.