'केंद्रात सरकार स्थापनेकडे कॉँग्रेसची वाटचाल'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 03:40 AM2019-04-25T03:40:05+5:302019-04-25T03:40:26+5:30
कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांना विश्वास
कैमगंज (उत्तर प्रदेश) : केंद्रात तिसऱ्यांदा संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार स्थापन करण्याच्या मार्गाकडे कॉँग्रेस वाटचाल करीत आहे. निवडणुकीतील आमच्या पक्षाची कामगिरी अनेकांच्या अपेक्षेपेक्षा खूप पलिकडची असेल, असे कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी बुधवारी सांगितले.
कॉँग्रेसच्या उत्तर प्रदेश विभागाचे सलमान खुर्शीद दोनदा प्रमुख होते. फारुखाबादमधून सलमान खुर्शीद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. खुर्शी म्हणाले की, २००९च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात कॉँग्रेसला २१ जागा मिळाल्या होत्या. तशीच कामगिरी यंदाही झाली, किंवा त्यापेक्षा अधिक चांगले निकाल हाती आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. यंदा या जागांचा टप्पा गाठून आम्ही त्याही पलिकडे गेलो, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. या वेळी लागणाºया उत्तर प्रदेशातील निकालांमधून अनेक प्रकारची आश्चर्ये जनतेला पहायला मिळणार आहेत, याची मला खात्री वाटते.
प्रियांका गांधी यांनी अलिकडेच पक्षात सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारली. त्या प्रचारात सक्रिय झाल्या. या निवडणुकीत प्रियांका गांधी फॅक्टरटचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यांच्या प्रचारसभांमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. प्रियांका जेथे जात आहेत, तेथे त्यांच्या स्वागतासाठी जी गर्दी होत आहे. ती केवळ उत्सुकतेपोटी नाही. जनतेचा हा उत्साह आणि प्रतिसाद पाहता पक्षाचे बळ निश्चितच वाढेल, अशा माझा विश्वास आहे, असे खुर्शीद यांनी नमूद केले.
केंद्रामध्ये यूपीएचे सरकार येण्याबाबतच्या शक्यतेविषयी खुर्शीद म्हणाले की, सरकार स्थापनेबाबत आपण आशावादी आहोत. प्रत्येकाला ती अपरिहार्यता वाटते. सरकारची रूपरेषा कशी असू शकेल, हा वादाचा मुद्दा असू शकेल, मात्र २३ मे रोजी हाती येणाºया निकालानंतर आम्ही यूपीए सरकारच्या दिशेने जात असल्याचे पाहायला मिळेल. देशाला गेल्या पाच वर्षांमध्ये ज्या भयावह अनुभवातून जावे लागले, त्या पासून देशाला मुक्तता हवी आहे. ते म्हणाले की, आमचे कार्यकर्ते नव्या नेतृत्वामुळे उत्साहाने भारावून गेले आहेत. त्यामुळे लोकांच्या अपेक्षांपेक्षा अधिक उत्तम असे आम्ही काही करुन दाखवू. सर्व पक्षांपेक्षा आम्ही पुढे असू शकतो. खरोखर आम्ही सरकार स्थापन करण्याच्या परिस्थितीपर्यंत जाऊ शकतो. (वृत्तसंस्था)
आम्ही दिलेली आश्वासने पाळतो
कॉँग्रेसने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेमुळे आमचा पक्ष भूतकाळात दिलेली आश्वासने पाळतो, केवळ हवेत इमले रचत नाही, यावर जनतेचा विश्वास बसला आहे, अशी पुस्तीही खुर्शीद यांनी जोडली.