थेनी (तामिळनाडू) : अन्याय केल्याची जाणीव झाल्यानेच काँग्रेसने न्याय योजना जाहीर केल्याची टीका करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या काळात १९८४ मध्ये झालेल्या शिख विरोधी दंगली, दलितांच्या विरोधीतील हिंसाचार, भोपाळ गॅस पीडितांच्याबाबत न्याय कोण करणार, असा प्रश्न विचारला आहे.तामिळनाडूतील थेनी आणि रामानंथपूरम येथे झालेल्या निवडणुक रॅलीत मोदी यांनी मार्गदर्शन केले. काँग्रेस आणि बेईमानी यांची खास दोस्ती आहे, परंतु कधी-कधी चुकीने का होईना, ते वास्तव सांगून जातात. अब न्याय होगा या निवडणुकीच्या प्रचारासाठी सुरू असलेल्या मोहिमेतच त्यांनी हे मान्य केले आहे की, गेली ६0 वर्षे त्यांनी अन्यायच केला आहे. शिख विरोधी, दलित विरोधी हिंसाचाराबाबत कोण न्याय करणार, असा प्रश्न मोदी यांनी विचारला. तामिळनाडूला समृद्ध बनविण्यासाठी द्रमुक आणि काँग्रेसचे खेळ बंद करून टाका, भ्रष्ट परिवारातील घराणेशाहीचे शासन संपवून टाका, असे आवाहन करून मोदी यांनी श्रीलंकन तमिळ बंधूंच्या समृद्धीसाठी काम करणे सुरू ठेवू, असे सांगितले. या सभेत मुख्यमंत्री के. पालनीस्वामी यांनीही काँग्रेस आणि द्रमुक पक्षांच्या आघाडीवर टीका केली. काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या राज्यातील आघाडीवरून शेजारच्या केरळ राज्यात एकमेकांविरोधात हे पक्ष काय भूमिका घेणार, असा प्रश्न त्यांनी केला.वडील अर्थमंत्री होते, तेव्हाच मुलानेही देश लुटला अशी टीका नाव न घेता करत, मोदी यांनी द्रमुक, काँग्रेस आणि महाभेसळीत समाविष्ट असलेल्या पक्षांना जगाच्या नकाशावर भारताची झालेली प्रगती सहन होत नाही. जे एकमेकांचे शत्रू होते, त्यांनीच आता हातमिळविणी केली आहे. द्रमुकच्या प्रमुखांनी काही दिवसापूर्वी काँग्रेस अध्यक्षांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ केला होता, परंतु आता एक झालेल्या विरोधकांना ते मान्य नव्हते, कारण ते प्रत्येक जण स्पर्धेत होते. या पक्षाने दक्षिणेतील सहकारी पक्षांचा अपमान केला होता, त्यांना द्रमुक पक्ष नको होता, असा आरोपही मोदी यांनी केला.
अन्यायाच्या जाणिवेतून काँग्रेसने न्याय योजना आणली; मोदींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 3:41 AM