कर्नाटकमध्ये काँग्रेस, जेडीएसचा 'धुव्वा'; ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुढे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 02:01 PM2020-12-30T14:01:29+5:302020-12-30T14:02:34+5:30
Karnatak Gram Panchayat Election Result: गेल्या वर्षी झालेल्या सत्तासंघर्षात काँग्रेस, जेडीएसची सत्ता उलथवून भाजपाने मुख्यमंत्रीपद मिळविले होते. यामुळे ही ग्रामपंचायत निवडणूक तिन्ही पक्षांसाठी खूप महत्वाची होती. विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या.
एकीकडे महाराष्ट्रात ग्राम पंचायत निवडणुकीचे फॉर्म भरणे, पॅनल उभे करणे आदीची लगबग सुरु असताना शेजारील कर्नाटकमध्ये आज 5,762 ग्राम पंचायतींवर कोणाचे राज्य असणार य़ाचा निकाल सुरु झाला आहे. दोन टप्प्यांत झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून 81 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ही लढत चुरशीची होणार असल्याचे सांगितले जात आहे.
22 आणि 27 डिसेंबरला मतदान झाले होते. काँग्रेस, जेडीएसकडून सत्ताखेचून आणलेल्या सत्ताधारी भाजपाने दोन्ही विरोधकांना धोबीपछाड देत 80 टक्के ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्याची योजना बनविली होती. आजच्या निकालाच्या सुरुवातीच्य़ा कलानुसार 80 टक्के ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचे दिसत नसले तरीही भाजपाच वरचढ ठरल्याचे दिसत आहे.
भाजपा 3,865, काँग्रेस 1,988 आणि जेडीएस 1,030 जागांवर पुढे आहे. सुरुवातीपासूनच भाजपाने मोठी उसळी घेतलेली आहे. राज्यात एकूण 6,004 ग्रामपंचायती आहेत. मात्र, कायदेशीर कारणांमुळे 242 ग्राम पंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. एकूण 94,348 जागांसाठी 2.8 लाख उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी सांगितले की, 85 ते 90 टक्के भाजप आणि समर्थक उमेदवार जिंकतील.
काही अपवाद वगळता निवडणूक शांततेत पार पडली होती. मात्र, ग्राम पंचायत सदस्य़ाची सीट मिळविण्यासाठी काही ठिकाणी उमेदवारांकडून २ ते 12 लाख रुपये देवस्थान, गावाच्या विकासासाठी देण्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. आज मतदान होत असले तरी निकाल उद्याच जाहीर होतील असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या सत्तासंघर्षात काँग्रेस, जेडीएसची सत्ता उलथवून भाजपाने मुख्यमंत्रीपद मिळविले होते. यामुळे ही ग्रामपंचायत निवडणूक तिन्ही पक्षांसाठी खूप महत्वाची होती. विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, काँग्रेस, जेडीएसने एकत्र येत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले होते. अखेर काँग्रेस त्रास देत असल्याचे सांगत कुमारस्वामींनी अश्रू गाळले होते. यानंतर भाजपाने काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडत नाराजीनाट्य घडविले होते. या आमदारांना मुंबईत आणून ठेवले होते.