काँग्रेसच्या कोपरकरांचा अर्ज मागे; विधान परिषदेसाठीच्या दोन जागांसाठी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 12:24 PM2021-11-26T12:24:13+5:302021-11-26T12:25:38+5:30
विधान परिषदेच्या दोन जागांसाठी १० डिसेंबरला मतदानाचा कार्यक्रम जाहीर झाला. मुंबई महापालिकेतील नगरसेवक या निवडणुकीत मतदार असतात. पालिकेच्या सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांचा विजय सहज असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे मानले जात होते.
मुंबई : विधान परिषदेसाठी मुंबई महापालिका मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारे काँग्रेस पदाधिकारी सुरेश कोपरकर यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे दोन जागांसाठीच्या या निवडणुकीत शिवसेनेचे सुनील शिंदे आणि भाजपचे राजहंस सिंह यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधान परिषदेच्या दोन जागांसाठी १० डिसेंबरला मतदानाचा कार्यक्रम जाहीर झाला. मुंबई महापालिकेतील नगरसेवक या निवडणुकीत मतदार असतात. पालिकेच्या सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांचा विजय सहज असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे मानले जात होते. मात्र, ऐनवेळी काँग्रेसचे कोपरकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. काँग्रेसने त्यांना अधिकृत उमेदवार घोषित केले नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान होऊन फोडाफोडीचा खेळ रंगण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, संख्याबळ नसताना काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून उमेदवारी आल्याने महाविकास आघाडीतील इतर पक्ष विशेषत: शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
- मुंबई काँग्रेसमधील अनेक नेत्यांनीही कोपरकर यांच्या उमेदवारीला विरोध केला. या पार्श्वभूमीवर कोपरकर यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या. अखेर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची विशेष बैठक झाली. यात कोपरकरांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय झाला.
- त्यानुसार गुरुवारी सायंकाळी कोपरकर यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे सिंह आणि शिवसेनेचे शिंदे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे.