संभाजी महाराज आमचं आराध्यदैवत, पण...; थोरातांनी सांगितलं नामांतरामागचं राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 05:58 PM2021-01-08T17:58:01+5:302021-01-08T19:18:21+5:30
औरंगाबादच्या नामांतराचा विषय तापला असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केली भूमिका
ठाणे : औरंगाबादचे संभाजीनगर या विषयावर चर्चा करण्याचे कारण नाही. त्यासाठीच्या आमच्या भूमिका स्पष्टपणे मांडल्या आहेत. त्यातच महाराजांच्या नावाला विरोध नसून ते आमचे आराध्यदैवत आणि श्रध्दा स्थान. काही विषय असे असतात की त्यातून काही वेगळी वातावरण निर्मिती होऊ नये असे, आमचे धोरण आहे. महाराज आमचे आराध्यदैवत आहे, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात ते आले असता काँग्रेसच्या कार्यालयास त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. आम्हाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे. परंतु त्याबरोबर भाजपाची विचार सरणी आणि कार्यपद्धती मान्य नाही.त्यामुळे आम्ही आमचा पक्ष वाढवत आहोत त्याचवेळी आम्ही महाविकास आघाडीत आहेत. आम्ही प्रत्येक वेळी योग्य पद्धतीने चर्चा करुन निर्णय घेऊ आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेऊ असेही थोरात यांनी सांगितलं.
माझ्याकडे तीन महत्त्वाचे पदे आहेत. त्यामुळे सहाजीकच एकाचकडे या तीन पदाचा कोणालाही हेवा वाटणारा आहे. पक्षश्रेष्ठींना वाटले तर ते यात विभाजन करु शकता. ते अनेकांना संधी देऊ शकता. त्यासाठी मी सुद्धा तयार आहे, की तरुण मंडळींना संधी द्या आणि नवे नेतृत्व घडवा, असेही थोरात यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या खांदेपालटाविषयी बोलताना स्पष्ट केले. येथील शासकीय विश्रामगृहात आल्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील आदींनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी स्थानिक मुद्यांवर ओझरती चर्चा केली. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्यांवर चर्चा झाली. दरम्यान या पुतळ्यासाठी ठाणे महापालिकेने अर्थसंकल्पात चर केल्याचे यावळी कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिले. यावेळी या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व माजी आमदार मोहन जोशी,मनोज शिंदे, शहर काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे,प्रदेश काँग्रेस सदस्य राजेश जाधव, सुरेश पाटीलखेडे आदी उपस्थित होते.