संगमनेर : कोरोनाच्या संकटात राजकारण करू नये, हीच अपेक्षा आमची सगळ्यांची आहे. दुर्दैवाने तेच घडते आहे. अशाच प्रकारची परिस्थिती आहे. राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते दिल्लीला गेले असते, तर तेथून ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनची महाराष्ट्राला खूप मदत झाली असती. परंतु तो फार्मा कंपनीवाला कुणीतरी त्यांचा कार्यकर्ता आहे. म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात जाणे हे काही फार योग्य नाही. असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना लगावला.मुंबई पोलिसांनी दमण येथील एका फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतले होते. यामुळे राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. महसूलमंत्री थोरात हे रविवारी (दि. १८) संगमनेरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
"फडणवीस पोलीस ठाण्याऐवजी दिल्लीला गेले असते तर राज्याला मदत झाली असती"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 2:25 PM