"उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्यावर विभाजनाची आठवण आली..."; काँग्रेसचा पंतप्रधानांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 10:08 PM2021-08-14T22:08:40+5:302021-08-14T22:12:50+5:30
14th August : India's Partition Horrors Remembrance Day फाळणीवेळी हिंसाचार उफाळला होता. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला.
पंतप्रधाननरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वातंत्र्य दिवसाच्या आधीचा एक दिवस म्हणजेच १४ ऑगस्ट हा 'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' (Partition Horrors Remembrance Day) म्हणून मानला जाणार असल्याची घोषणा केली. भारत-पाकिस्तान फाळणीची घटना ही वेदनादाई होती. तिरस्कार आणि हिंसाचारामुळे आमच्या लाखो बंधू भगिनींना विस्थापित व्हावे लागले होते. ही वेदना कधीही विसरता येणार नाही. अनेकांना प्राणही गमवावे लागले होते, असं मोदी यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या घोषणेनंतर काँग्रेसनं त्यांच्यावर हल्लाबोल केला. काँग्रेसनं यावर प्रतिक्रिया देत उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्यानंतर विभाजनाची आठवण झाली, असं म्हणत पंतप्रधानांवर निशाणा साधला.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी यावरून टीका केली आहे. "फूट पाडणारी फसवणूक उघड झाली. आता तुम्ही देशाला फसवू शकत नाही. २२ मार्चला पाकिस्तानचं अभिनंदन. आठवा २२ मार्च हा तो दिवस होता जेव्हा मुस्लीम लीगनं (२२ मार्च १९४०) विभाजनाचा प्रस्ताव पारित केला होता. गेल्या १४ ऑगस्ट रोजीही पाकिस्तानचं अभिनंदन. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्यानंतर विभाजनाची आठवण झाली. वाह साहेब," असं म्हणत सुरजेवाला यांनी पंतप्रधानांवर टीका केली. त्यांनी आपल्या ट्वीटसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही ट्वीटही शेअर केले आहेत.
विभाजनकारी छल-कपट की पोल खुली,
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) August 14, 2021
अब देश को नही बरगला सकते।
22 मार्च को पाकिस्तान को बधाई,
याद रहे 22 मार्च वो दिन है जब मुस्लिम लीग ने (22 मार्च, 1940) को बँटवारे का प्रस्ताव पारित किया था।
पिछले 14 अगस्त को भी पाक को बधाई।
यू.पी का चुनाव आते ही विभाजन की याद आई।
वाह साहेब ! pic.twitter.com/4cks8Rvlw7
काय म्हणाले होते मोदी ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून म्हटलं की, फाळणीमध्ये विस्थापित व्हावं लागलेल्या आणि प्राण गमावलेल्या आमच्या लाखो बंधु-भगिनींच्या बलिदानाला लक्षात ठेवण्यासाठी आजचा दिवस 'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' म्हणून मानला जाईल. आजचा हा दिवस, #PartitionHorrorsRemembranceDay आम्हाला भेदभाव, वैमनस्य आणि वाईट भावनांच्या विषाला संपविण्यासाठी केवळ प्रेरितच करणार नाही, तर यामुळे एकता, सामाजिक सद्भावनेनं आणि मानवी संवेदनांना आणखी मजबूत करणार आहे, असं मोदी म्हणाले. (14th August : India's Partition Horrors Remembrance Day)