पंतप्रधाननरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वातंत्र्य दिवसाच्या आधीचा एक दिवस म्हणजेच १४ ऑगस्ट हा 'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' (Partition Horrors Remembrance Day) म्हणून मानला जाणार असल्याची घोषणा केली. भारत-पाकिस्तान फाळणीची घटना ही वेदनादाई होती. तिरस्कार आणि हिंसाचारामुळे आमच्या लाखो बंधू भगिनींना विस्थापित व्हावे लागले होते. ही वेदना कधीही विसरता येणार नाही. अनेकांना प्राणही गमवावे लागले होते, असं मोदी यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या घोषणेनंतर काँग्रेसनं त्यांच्यावर हल्लाबोल केला. काँग्रेसनं यावर प्रतिक्रिया देत उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्यानंतर विभाजनाची आठवण झाली, असं म्हणत पंतप्रधानांवर निशाणा साधला.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी यावरून टीका केली आहे. "फूट पाडणारी फसवणूक उघड झाली. आता तुम्ही देशाला फसवू शकत नाही. २२ मार्चला पाकिस्तानचं अभिनंदन. आठवा २२ मार्च हा तो दिवस होता जेव्हा मुस्लीम लीगनं (२२ मार्च १९४०) विभाजनाचा प्रस्ताव पारित केला होता. गेल्या १४ ऑगस्ट रोजीही पाकिस्तानचं अभिनंदन. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्यानंतर विभाजनाची आठवण झाली. वाह साहेब," असं म्हणत सुरजेवाला यांनी पंतप्रधानांवर टीका केली. त्यांनी आपल्या ट्वीटसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही ट्वीटही शेअर केले आहेत.