काँग्रेस नेते दामोदर शिंगडा यांचे निधन; वयाच्या २५ व्या वर्षी बनले होते खासदार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 08:44 PM2021-05-02T20:44:58+5:302021-05-02T20:45:25+5:30
पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले शिंगडा हे गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जायचे.
वाडा : काँग्रेसचे माजी खासदार दामोदर बारकू शिंगडा यांचे रविवारी वसई येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान सायंकाळी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. सन १९८० मध्ये ते प्रथम डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर याच मतदारसंघातून ते १९८४, १९८९, १९९१ व २००४ असे पाच वेळा निवडून आले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी व नातवंडे असा परिवार आहे.
भारतीय काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्या दामोदर शिंगडा यांनी १९७९ मध्ये प्रथम जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून ते विजयी झाले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. १९८० मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी ते खासदार म्हणून निवडून आले. पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले शिंगडा हे गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जायचे.
शेतीनिष्ठ शेतकरी म्हणूनही ते सर्वांना परिचित होते. त्यांनी अनेक वर्षे काॅंग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्षपदाची धुरा वाहिली होती. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर त्यांचे जवळचे संबंध असल्याने त्यांना अजातशत्रू म्हणून ओळखले जात होते.