Farmers Protest Violence : "शेतकऱ्यांनी १५ जणांना पकडले, त्यांच्याजवळ सरकारी ओळखपत्रे आढळली"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 07:07 PM2021-01-27T19:07:13+5:302021-01-27T19:08:39+5:30
Farmers Protest Violence : एका शांततामय आंदोलनास चुकीच्या मार्गाने दर्शवण्याचे हे सुनियोजित षडयंत्र होते, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या हिंसाचारात ३०० पेक्षा अधिक पोलीस जखमी झाले. तर, सार्वजिनक मालमत्तेचेही मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले.
या हिंसाचाराबाबत काँग्रेस नेते व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शेतकऱ्यांनी १५ जणांना पकडून दिल्ली पोलिसांकडे सोपवले आहे. त्यांची नावे समोर आली पाहिजे. त्या सर्वांकडे सरकारी ओळखपत्रे आढळली आहेत. आता तुम्ही समजून घ्या सरकार कुणाचे आहे? एका शांततामय आंदोलनास चुकीच्या मार्गाने दर्शवण्याचे हे सुनियोजित षडयंत्र होते, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
याचबरोबर, दिग्विजय सिंह म्हणाले, "शेतकरी संघटना व पोलिसांमध्ये चर्चा झाल्यानंतर ट्रॅक्टर रॅलीसाठी तीन मार्ग ठरविण्यात आले होते. सिंघु बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाजीपूर बॉर्डर या मार्गांवरून ट्रॅक्टर रॅली निघाली होती. सिंघु बॉर्डर व टिकरी बॉर्डरवर ट्रॅक्टर रॅलीला काहीच अडचण आली नाही. गाजीपूर बॉर्डर यामुळे अडचण निर्माण झाली. कारण, दिल्ली पोलिसांनी जो मार्ग दिला होता, त्यांनी तो बदला व तिथं बॅरिकेड्स लावले गेले होते. शेतकऱ्यांनी जेव्हा मार्ग मोकळा करण्याची मागणी केली, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुरांचा मारा केला आणि लाठीमार केला. यामुळे परिस्थिती चिघळली आणि हेच कारण ठरले."
"The farmers have handed over 15 people who started the violence yesterday. They have been found to have govt identity cards. Now you only understand who is in the govt. This was an act of concerted conspiracy to malign a peaceful movement," says Congress leader Digvijaya Singh https://t.co/Jb0Haes3kt
— ANI (@ANI) January 27, 2021
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. दरम्यान, काल या कायद्यांविरोधात आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. तसेच या हिंसाचारात तिनशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. तर लाल किल्ल्यावरही धार्मिक ध्वज फडकवला गेल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे आता पोलीस आणि सरकारकडून हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.
तर दुसरीकडे आता शेतकरी आंदोलनामध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते व्ही.एम. सिंग यांनी कृषी आंदोलनामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय किसान युनियन (भानू) ठाकूर भानू प्रताप सिंह यांनीही शेतकरी आंदोलनातून माघार घेतली. आंदोलनातून माघार घेणाऱ्या दोन्ही संघटना या उत्तर प्रदेशमधील आहेत.