नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी होऊन 43 मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी झाला. त्यामध्ये 15 जणांनी कॅबिनेट तर 28 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे चारही जण वेगळ्या पक्षांतून भाजपमध्ये आले आहेत. मोदींचे मंत्रिमंडळ आता 78 जणांचे झाले असून त्यात 38 नव्या चेहेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना जुन्या मंत्र्यांपैकी 12 जणांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यामध्ये प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन आदी ज्येष्ठ मंत्र्यांचा समावेश आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. डॉ. हर्षवर्धन यांच्या राजीनाम्याची माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "बिचारे डॉ. हर्षवर्धन... 'बळीचा बकरा' ठरले" अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जयराम रमेश (Congress Jairam Ramesh) यांनी डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांना मोदी सरकारकडून 'बळीचा बकरा' बनवण्यात आल्याचं म्हटलं आहे. जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
'बिचारे डॉ. हर्षवर्धन... उच्च स्तरावरच्या स्मारकीय अपयशासाठी एका चांगल्या व्यक्तीला बळीचा बकरा बनवण्यात आलं' असं ट्विट जयराम रमेश यांनी केलं आहे. कोरोनाच्या काळात देशाच्या आरोग्य मंत्रालयावर खूप मोठा ताण वाढला. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक आरोप आणि व्यवस्थापनाच्या त्रृटींवरुन टीकांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सामोरं जावं लागलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महिला, अनुसूचित जाती-जमाती, अन्य मागासवर्गीय या गटांमधील एकूण 31 मंत्री आहेत. त्यापैकी काही मंत्री हे माजी सनदी अधिकारी, आयआयटीतून शिक्षण घेतलेले तर काही जण डॉक्टर व अन्य पेशातीलआहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील हे सर्वात तरुण मंत्रिमंडळ असणार आहे.
12 मंत्र्यांचे राजीनामे
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या काही तास आधी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद या मंत्र्यांसह 12 केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, संतोषकुमार गंगवार, देबश्री चौधरी, रतनलाल कटारिया, संजय धोत्रे, थावरचंद गेहलोत, डी. व्ही. सदानंद गौडा, प्रतापचंद्र सारंगी, आदींचीही नावे आहेत.