मुंबई: महाविकास आघाडी सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्वबळाचा सूर कायम ठेवला आहे. काल काँग्रेसचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी पवारांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. तुम्हाला पुढील विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढायची असेल, तर स्पष्ट सांगा, अशा शब्दांत पवारांनी नाराजी बोलून दाखवली. यानंतर आता पटोलेंनी २०१४ मध्ये मिळालेल्या धोक्याची आठवण करून दिली आहे. २०१४ मधील घडामोडींची आठवण करून देत पटोलेंनी थेट शरद पवारांशी पंगा घेतल्याचं बोललं जात आहे.
'आमची लाईन ठरलेली आहे. स्वबळाच्या मुद्द्यावर आम्ही कायम आहोत. कारण याआधी आम्ही अनेक धक्के सहन केले आहेत. २०१४ मध्ये मिळालेला धोका पुन्हा मिळू नये यासाठी आम्ही स्वबळाची तयारी सुरू केली आहे,' असं नाना पटोले म्हणाले. २०१४ मधील घटनांची आठवण करून देत पटोलेंनी राष्ट्रवादीबद्दल अविश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे.
नाना पटोलेंच्या विधानाला राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. हे सरकार कायम राहावं, ते अडचणीत येऊ नये ही तिन्ही पक्षांची आणि त्या पक्षांच्या नेत्यांची जबाबदारी आहे. कालच काँग्रेसचे मंत्री शरद पवारांना भेटून गेले आहे. त्यात पवारांनी याबद्दलची भूमिका मांडली. तिन्ही पक्षातल्या नेत्यांनी विधानं करताना काळजी घ्यायला हवी. आपल्या विधानांचा परिणाम सरकारवर होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तशी काळजी घेतली जात नसेल, तर ते दुर्दैवी आहे,' असं शिंदे म्हणाले. काँग्रेसला सोबत राहायचं नसेल, तर त्यांनी तसं स्पष्ट सांगावं, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.
२०१४ मध्ये नेमकं काय घडलं? काँग्रेसला राष्ट्रवादीनं 'धोका' दिला?२०१० मध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री सुनिल तटकरे यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. मुख्यमंत्री चव्हाण यांनी श्वेतपत्रिका काढली आणि १ टक्काही सिंचन वाढलं नसल्याचं जाहीर केलं. हा राष्ट्रवादीसाठी धक्का होता.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी शिखर बँकेवर प्रशासक नेमून उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का दिला. मंत्री छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदनाच्या बांधकाम प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप झाले. राष्ट्रवादीचे अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आले. यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीनं सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती निवडणूक झाली. २०१४ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीनं स्वबळावर निवडणूक लढवली. युती तुटल्यानं शिवसेना आणि भाजपही स्वतंत्र लढले. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र ते बहुमतापासून दूर राहिले. या परिस्थितीत राष्ट्रवादीनं भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आणि राज्यात भाजपचं सरकार आलं.