बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला पाहवत नाही, म्हणून खुर्ची ओढण्याचे प्रयत्न; पटोले यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 05:14 PM2021-06-21T17:14:57+5:302021-06-21T17:24:58+5:30
दबावतंत्रापुढे मविआ सरकार झुकणार नाही; पाच वर्ष सरकार भक्कम, पटोले यांचं वक्तव्य.
"राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे परंतु सत्ता नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला भाजप सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून राज्यातील मविआ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रातूनही त्यांना केंद्रीय तपास यंत्रणा कसा त्रास देत आहेत हे स्पष्ट होत आहे. राज्यातील मविआ सरकार अस्थिर करण्याचे भाजपाचे आतार्यंतचे सर्व प्रयत्न फेल गेले असून आताही त्यांचा कुटील डाव यशस्वी होणार नाही. सरकार पाच वर्षे चालेल," असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
"भाजप केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून सुरुवातीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्रास देत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात वाढला, त्याच शिवसेनेला भाजप आता त्रास देत आहे, हा भाजपचा कृतघ्नपण आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला पाहवत नसून त्यांची खूर्ची ओढण्याचा प्रयत्न ते करत आहेत," असा आरोपही पटोले यांनी केला.
सरकार अस्थिक करण्यासाठी आटापीटा
"राज्यात मविआ सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे नेते सरकार अस्थिर करण्यासाठी आटापीटा करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा या फक्त विरोधी पक्षांच्या लोकांवरच कारवाई करत आहेत. दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशाऱ्याने विरोधकांवर दबाव आणण्याचे काम ते करत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना दिल्या जात असलेल्या त्रासाला पत्रातून वाचा फोडली आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातून वारंवार उघड झाले आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी
"महाराष्ट्रातील सत्तेपासून वंचित राहिल्याने भाजप मागील दीड वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम पद्धतशिरपणे करत आहे. विरोधी पक्षाचे सरकार अस्थिर करण्याचे, विरोधांचा आवाज दाबण्याचे प्रकार सुरु आहेत.परंतु या दबावतंत्रामुळे भाजपचे सत्तेचे दिवास्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही दबावाला हे सरकार बळी पडणार नाही," असेही पटोले म्हणाले.
राष्ट्रवादी, शिवसेना युती होणार असल्यास शुभेच्छा
२०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती होणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. भारतीय जनता पक्षाविरोधात कोणतीही आघाडी उभी करायची असेल तर ती काँग्रेस पक्षाशिवाय होणे शक्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.