२०१४ पासून देशाला ग्रहण लागले; लोकशाहीच्या चारही स्तंभांचे स्वातंत्र्य धोक्यात- पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 08:50 AM2021-08-10T08:50:24+5:302021-08-10T08:50:47+5:30
लोकशाही व्यवस्था वाचवायची वेळ आली असून त्यासाठी सर्वांनी या लढाईत सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केले.
मुंबई : लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून देशाची प्रगती होत असताना मागील काही वर्षांत ही सर्व व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सुरू आहे. २०१४ पासून देशाला ग्रहण लागले आहे. खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेले आज संविधान व्यवस्था बदलण्याचे काम करत आहेत. लोकशाहीच्या चारही स्तंभांचे स्वातंत्र्य आज धोक्यात आहे. लोकशाही व्यवस्था वाचवायची वेळ आली असून त्यासाठी सर्वांनी या लढाईत सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केले.
ऑगस्ट क्रांती मैदानात काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नाना पटोले बोलत होते. ते म्हणाले की, देशातील वंचित, शोषित, बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पाच हजार वर्षे संघर्ष करावा लागला. मोठ्या संघर्षानंतर स्वातंत्र्याची पहाट देशात आली. स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे; पण या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे योगदान नाही त्या विचारसणीचे लोक सध्या सत्तेत आहेत. स्वातंत्र्य व लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सध्या ते करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.
यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याची सुरुवात ऑगस्ट क्रांती मैदानातून झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले; परंतु आज ती व्यवस्था मोडीत काढण्याचे काम केले जात आहे. तर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी झोकून देऊन लढा दिला. त्यांच्या निर्धारानेच आपल्याला आजचा हा दिवस पाहायला मिळत आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, याच मैदानातून १९४२ साली जुलमी इंग्रज राजवटीला ‘चले जाव’चा नारा दिला गेला. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांत आज पुन्हा एकदा अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे. आज देशातील मोदी सरकारचा अन्याय व अत्याचार पाहता ‘भाजप चले जाव’चा नारा देण्याची वेळ आली आहे.
ऑगस्ट क्रांती मैदानात काँग्रेसच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. तसेच संविधान व देश वाचवण्यासाठी शपथ देण्यात आली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस नेते, पदाधिकारी उपस्थित होते.