काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी देशात सुरू असलेल्या कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेवरुन पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना विरोधी लसीकरणासाठीचा ३५ हजार कोटी रुपयांचा निधी नेमका कुठे खर्च केला गेला? असा सवाल प्रियांका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका वारंवार कोरोना लसीकरणाच्या आकडेवारीवरुन केंद्र सरकारला रोखठोक प्रश्न विचारत आहेत.
"मे महिन्यात लस उत्पादन क्षमता ८.५ कोटी. एकूण उत्पादन झालं ७.९४ कोटी आणि लस देण्यात आल्या ६.१ कोटी, सरकारचा दावा आहे की जूनमध्ये १२ कोटी डोस येणार आहेत. पण कुठून? लस उत्पादन करणाऱ्या दोन्ही कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेत ४० टक्क्यांची वाढ झालीय का? लसीकरणाचं ३५ हजार कोटींचं बजेट नेमकं कुठे खर्च झालं? अंधेर वैक्सीन नीति, चौपट राजा", असं ट्विट प्रियांका गांधी यांनी केलं आहे.
याआधी बुधवारी देखील प्रियांका यांनी युनिव्हर्सल लसीकरणाची मागणी करुन फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. यात आज देशात दरदिवशी सरासरी १९ लाख लोकांना लस दिली जात आहे. केंद्र सरकारच्या पोकळ लसीकरण योजनेनं देशाच्या लसीकरणाला अंधारात टाकलं आहे, असं म्हटलं होतं. काँग्रेसनं बुधवारी मोफत लसीकरणाची मागणी करत सोशल मीडियावर ‘स्पीक-अप फॉर फ्री यूनिवर्सल व्हॅक्सीनेशन’ हॅशटॅग अभियान चालवलं होतं.