Rajiv Satav: काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पार्थिवावर कळमनुरीत आज होणार अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 07:11 AM2021-05-17T07:11:43+5:302021-05-17T07:12:08+5:30

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी १० वाजता कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Congress leader Rajiv Satav's body will be cremated today at Kalamanuri | Rajiv Satav: काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पार्थिवावर कळमनुरीत आज होणार अंत्यसंस्कार

Rajiv Satav: काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पार्थिवावर कळमनुरीत आज होणार अंत्यसंस्कार

Next

पुणे / हिंगोली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे रविवारी पहाटे जहांगीर रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना २३ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या पश्चात आई माजी मंत्री रजनी सातव, पत्नी डॉ. प्रज्ञा, मुलगा पुष्कराज, मुलगी युवराज्ञी व मोठा आप्त परिवार आहे. 

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी १० वाजता कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येणार आहे. दरम्यान, रविवारी रात्री त्यांचे पार्थिव हिंगोलीत आणण्यात आले. या वेळी आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. सातव हे ९ मे रोजी कोरोनामधून बरे झाले होते. त्यांची प्रकृती 
सुधारत असतानाच त्यांना ‘सायटोमेगॅलोव्हायरस’ या नव्या विषाणूची लागण झाली होती. औषधांना ते योग्य प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यपाल सिंग यांनी सांगितले होते. ते धोक्याबाहेर असल्याचे बोलले जात होते, असे असताना  शुक्रवारी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती आणखी खालावली. उपचारादरम्यान रविवारी पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांनी त्यांनी अखरेचा श्वास घेतला.

सातव यांचे निधनाचे वृत्त समजताच आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री विश्वजित कदम, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, तसेच माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे यांनी जहांगीर रुग्णालयाकडे धाव घेतली. सातव यांच्या मातोश्री रजनी सातव या शनिवारी रात्रीच पुण्यात आल्या होत्या. 

कोरोनाची लागण झाल्यानंतर, सातव यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईला हलविण्याचा विचार करण्यात आला होता. परंतु, त्यांची प्रकृती लक्षात घेता त्यांना प्रवास झेपणार नाही, असे डॉक्टरांचे मत पडल्यानंतर त्यांच्यावर पुण्यातच उपचार करण्यात आले. याही स्थितीमध्ये त्यांनी संघर्ष सुरू ठेवला होता. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे वाटत असतानाच त्यांना ‘सायटोमेगॅलोव्हायरस’ या नव्या विषाणूची लागण झाल्याचे निदान करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालावत गेली.  

खासदार सातव हे २० एप्रिल रोजी हिंगोलीत होते. त्यांनी जिल्ह्यात कोरोनाविषयक विविध उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी संवाद साधला होता. ऑक्सिजन प्लांट, औषधी, नवीन कोविड सेंटर आदींबाबत सूचना दिल्या होत्या. त्यावेळी ते आजारी असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होते. राजकीय जीवनात पंचायत समिती सदस्य ते खासदार व काँग्रेसचा राष्ट्रीय पातळीवरील चेहरा, असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. कळमनुरीचे आमदार, हिंगोलीचे खासदार व आता राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. मतदारसंघातच नव्हे, तर देशातील विविध भागांत त्यांनी संघटनेचे जाळे निर्माण करून आपला चाहता वर्ग निर्माण केला होता.     

सातव यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची एकच गर्दी
कळमनुरी : खासदार राजीव सातव  यांच्या निधनाची वार्ता कळताच  रविवारी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली होती. खा. सातव यांचे पार्थिव रात्री नऊच्या दरम्यान कळमनुरी येथे आले. पार्थिव पाहताच अनेक कार्यकर्त्यांचे कंठ दाटून आले. कार्यकर्त्यांनी ‘राजीव सातव अमर रहे, राजीव सातव  जिंदाबाद’, अशा घोषणा दिल्या. अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पार्थिव कळमनुरीत दाखल होताच  कार्यकर्त्यांनी त्यांच्या शववाहिनीवर पुष्पवृष्टी केली. सोमवारी सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. 

 

Web Title: Congress leader Rajiv Satav's body will be cremated today at Kalamanuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.