“स्वाभिमानी महिलेसोबत बलात्कार झाला तर ती जीव देईल, राज्यात फिरणार नाही”; काँग्रेस नेत्याचं विधान
By प्रविण मरगळे | Published: November 2, 2020 07:59 AM2020-11-02T07:59:40+5:302020-11-02T08:02:42+5:30
Congress Leader Mullapalli Ramachandran Controversial Remark News: केरळच्या महिला व बालविकास मंत्री केके शैलजा यांनी काँग्रेस नेते मुल्लापल्ली रामचंद्रन यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेतला आहे.
तिरुवनंतपुरम – केरळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी बलात्कार पीडित महिलांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. एखाद्या स्वाभिमानी महिलेवर बलात्कार झाला तर ती जीव देईल, राज्यभरात फिरत बसणार नाही या विधानामुळे मुल्लापल्ली रामचंद्रन यांच्याविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे. देशात महिला अत्याचाराचे प्रमाण कमी होत नसताना अशाप्रकारे एका नेत्याने विधान केल्यामुळे त्यांच्याविरोधात रोष निर्माण होत आहे.
सरकारविरोधात आंदोलन करताना मुल्लापल्ली यांनी हे विधान केले आहे. यावेळी सरकारवर आरोप करताना ते म्हणाले की, रोज सकाळी ती महिला उठून दावा करते माझ्यासोबत बलात्कार झाला आहे. या महिलेला पुढे करून मुख्यमंत्री राजकारण करत आहेत, परंतु हे ब्लॅकमेल करणारं राजकारण इथं चालणार नाही, केरळच्या लोकांना तुमचा खेळ माहिती पडला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच एका देहविक्री करणाऱ्या महिलाला पुढे करून तुम्ही आरोप करत असाल तर जनता ते ऐकणार नाही. जर कोणी महिला एकदा सांगत असेल तिच्यासोबत बलात्कार झाला आहे तर आम्ही समजू शकतो, पण स्वाभिमानी महिला जर बलात्कार झाला तर जीव देईल, पण पुन्हा असा प्रकार होऊ देणार नाही, मात्र ती महिला बोलतेय तिच्यासोबत राज्यभरात बलात्कार झाला आहे असं वादग्रस्त विधान मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी केलं.
काय आहे हे प्रकरण?
मागील काही वर्षापासून केरळमध्ये सोलार ऊर्जा घोटाळ्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. या घोटाळ्यात ज्या महिलेवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला तिने काँग्रेस नेत्याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. मात्र मुल्लापल्ली यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सगळीकडे आक्रोश पसरला, त्यानंतर त्यांनी आपण जे काही विधान केले त्यामुळे कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो असं म्हटलं आहे.
महिला व बालविकास मंत्र्याकडून टीकास्त्र
केरळच्या महिला व बालविकास मंत्री केके शैलजा यांनी रामचंद्रन यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेतला आहे. बलात्कार हा सगळ्यात क्रूर गुन्हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे. ज्या महिलेवर बलात्कार झाला ही तिची चूक नाही. मुल्लापल्ली यांनी अशाप्रकारे विधान करायला नको होतं, पण त्यांच्या या विधानाचा आम्ही कडक शब्दात निषेध करतो असं केके शैलजा यांनी सांगितले.