...तेव्हा तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या! सुरक्षेतील कपातीवरून आकांततांडव करणाऱ्या भाजपा नेत्यांना टोला
By बाळकृष्ण परब | Published: January 10, 2021 04:19 PM2021-01-10T16:19:34+5:302021-01-10T16:20:20+5:30
Maharashtra Politics News :
मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाविरोधात भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका होत आहे. मात्र सुरक्षेतील कपातीवरून आकांततांडव करणाऱ्या भाजपा नेत्यांना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी चिमटा काढला आहे.
या विषयी केलेल्या ट्विटमध्ये सचिन सावंत म्हणाले की, भाजपा नेत्यांना धोका नसल्याने सुरक्षा कमी झाली तर आकांततांडव, आक्रोश, विलाप, बोंब, इत्यादी भावना उचंबळू लागल्या आहेत. परंतु गांधी परिवाराला धोका असतानाही. त्यांची आणि डॉ. मनमोहन सिंग यांची सुरक्षा, स्टाफ कमी करताना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मोदींची सूडभावना असते. मविआ सरकारची नाही, असा टोला लगावला आहे.
दरम्यान, राज्य सरकारने मोठा निर्णय घेताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य काही नेत्यांच्या सुरक्षेत घट करण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमधील उच्चपदस्थ मंत्री अधिकाऱ्यांच्या बैठकीत नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने वाय दर्जाच्या सुरक्षेची शिफारस केली होती, यापूर्वी देवेंद्र फडणवीसांना झेड प्लस सुरक्षा होती.
इतकचं नाही तर काही मंत्र्याची सुरक्षाही कमी करण्यात आली आहे. यात संजय बनसोडे, अस्लम शेख यांचा समावेश आहे. तर भाजपाच्या चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेबाबत वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येतो, ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांना वाय दर्जावरून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर राज ठाकरेंच्या सुरक्षेतही कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज ठाकरेंना झेड सिक्युरिटी मिळत होती त्याठिकाणी आता वाय सिक्युरीटी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.