मुंबई: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्याची घोषणा केली. खेलरत्न पुरस्काराला आधी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे ओळखले जात होते, पण आता या पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार अस करण्यात आलं आहे. यावरुन आता काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधलाय.
मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढलं, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत केली आहे. सावंत यांनी ट्विटरवर तीन ट्वीट केले, त्यातून त्यांनी मोदींवर निशाणा साधला. 'राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न होत आहे. मेजर ध्यानचंद यांचे नाव कोणत्याही ठिकाणी व पुरस्काराला देण्याचे स्वागतच आहे. त्यांच्या नावाने सर्वोत्तम खेळ पुरस्कार 2002 पासून आधी आहेच. दुर्दैवाने मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले आहे', अशी टीका सचिन सावंत यांनी केली.
राजीवजींचे स्थान हलणार नाही...सावंत पुढे म्हणतात, 'शहीद राजीव गांधी हे देशाचे सुपुत्र व हिरो होते. त्यामुळे मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी राजीवजींचे स्थान हलणार नाही. स्वतःची लाईन वाढत नाही तर दुसऱ्याची कमी करणे ही मोदींची मानसिकता आहे. तरीही जर खेळाडूंचे नाव देण्याची तात्विक भूमिका असेल. तर मोदी व जेटली यांचे नाव ज्या स्टेडियमना दिले आहे ते बदलून दिग्गज खेळाडूंचे नाव देण्याची सुरुवात करा. सरदार पटेलांचे नाव छोटं करुन हयातीतच स्वतःचे नाव स्टेडियमला देणारे मोदी निश्चितपणे याचा विचार करतील ही अपेक्षा. मेजर ध्यानचंद अमर रहे! राजीव गांधी अमर रहे!', असा खोचक टोलाही सावंत यांनी मोदींना लगावलाय.
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन म्हणाले की, मला संपूर्ण भारतातील नागरिकांकडून खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद ठेवण्याबाबत आग्रह केला जात होता. लोकांच्या या भावनेचा सन्मान राखत खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद पुरस्कारने यापुढे ओळखलं जाईल असं त्यांनी सांगितले.
खेलरत्न पुरस्काराचा इतिहास
या पुरस्काराची सुरुवात १९९१-९२ मध्ये झाली होती. तेव्हा या पुरस्काराचं नाव देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर नावावर ठेवलं होतं. क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येत होते. खेळाडूंना सन्मानित करून त्यांची प्रतिष्ठा वाढवणे. समाजात अशा खेळाडूंना प्रतिमा उंचावणे यासाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जात होता. मात्र आता या पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल.