Maratha Reservation : चंद्रकांत पाटलांना महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा आहे का? काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 08:22 PM2021-05-27T20:22:27+5:302021-05-27T20:23:30+5:30

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिचे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे पण त्यासाठी चंद्रकांत पाटलांनी दाखवलेला मार्ग राज्याला उत्तर प्रदेशातील गंगाघाटाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे, असे डॉ. संजय लाखे पाटील यांनी सांगितले.

Congress leader Sanjay Lakhe Patil criticizes BJP over Maratha Reservation | Maratha Reservation : चंद्रकांत पाटलांना महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा आहे का? काँग्रेसचा सवाल

Maratha Reservation : चंद्रकांत पाटलांना महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा आहे का? काँग्रेसचा सवाल

googlenewsNext
ठळक मुद्दे'भाजपाच्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि मोदी सरकारमुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.'

मुंबई : पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारासाठी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवून कोट्यावधी लोकांचे आरोग्य धोक्यात घालणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गलथानपणामुळेच देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातील २१ पेक्षा जास्त जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा दर सरासरीपेक्षा जास्त असताना मराठा आरक्षणासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा अन्यथा वेळ जाईल, असे म्हणून लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा आहे का? असा संतप्त सवाल करत स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी भाजपा नेत्यांनी छत्रपती संभाजीराजेंवर दबाव टाकण्याचे पाप करू नये, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी दिला आहे.  

भाजपाच्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि मोदी सरकारमुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. याचा राजकीय फटका आपल्याला बसू नये म्हणून वारंवार खोटे बोलून आपल्या पापाची जबाबदारी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील नेते करत आहेत. राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णवाढीचा दर सरासरीपेक्षा जास्त असल्याचे  राज्याच्या मंत्रीमंडळासमोर ठेवलेल्या अहवालातून स्पष्ट  झाले आहे. तरीही आपल्या राजकीय स्वार्थासाठी विनायक मेटेंसारख्या बुजगावण्यांना पुढे करून मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा कुटील डाव भाजपाने रचला आहे, असे डॉ. संजय लाखे पाटील म्हणाले.


याचबरोबर, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आता मराठा समाजाला आरक्षण केंद्र सरकार, पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीच देऊ शकतात. भाजपाला आरक्षणाची एवढीच काळजी असेल तर त्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. पण भाजपाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही तर मराठा समाजाचा वापर करून राज्य सरकारला बदनाम करण्याचा व आपला राजकीय स्वार्थ गाठायचा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिचे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे पण त्यासाठी चंद्रकांत पाटलांनी दाखवलेला मार्ग राज्याला उत्तर प्रदेशातील गंगाघाटाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे, असे डॉ. संजय लाखे पाटील यांनी सांगितले. 

'राजकीय स्वार्थासाठी छत्रपतींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न'
मराठा आरक्षणप्रकरणी भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाल्याने राज्यातील जनतेचा आता भाजपा नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. जनतेसमोर तोंड दाखवायला जागा उरली नसल्याने चंद्रकांत पाटील छत्रपती संभाजी राजेंनी आंदोलनाचे नेतृत्व करावे म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच भाग म्हणून छत्रपती संभाजी राजेंना भाजपाने खासदार केल्याचे सांगत आहेत. काँग्रेस सरकारांनी लता मंगेशकरांसारख्या अनेक महान कलाकारांना भारतरत्न दिला. सचिन तेंडुलकर सारख्या महान खेळाडूला भारतरत्न देऊन राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर घेतले. विविध क्षेत्रातील अनेक कर्तृत्वान व्यक्तींना राज्यसभेवर घेतले पण कधीही राजकीय स्वार्थासाठी त्यांचा वापर केला नाही. परंतु सत्ता गेल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या चंद्रकांत पाटलांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी छत्रपतींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे, मराठा समाज हे कदापी खपवून घेणार नाही. चंद्रकांत पाटलांनी खोटे बोलून मराठा समाजातील तरूणांची माथी भडकवण्याचा संघी उद्योग बंद केला नाही तर मराठा समाज त्यांना योग्य धडा शिकवेल असे डॉ. संजय लाखे पाटील म्हणाले.

Web Title: Congress leader Sanjay Lakhe Patil criticizes BJP over Maratha Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.