राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिनी लॉकडाऊन आणि अनिल देशमुख यांचा राजीनामा यासह विविध विषयांवर राज ठाकरे यांनी मंगळवारी भाष्य केले. आधी जो कोविड आला त्यापेक्षा दुसरी कोरोनाची लाट भयंकर आहे, पण हे महाराष्ट्रातच का वाढतेय? महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांची संख्याही जास्त आहे. शेतकरी मोर्चा, पश्चिम बंगाल निवडणूक सुरू आहेत. तिथे कोरोनाची लाट पसरलीय हे दिसत नाही, पण महाराष्ट्रात कोरोना लाट सर्वाधिक पसरतेय हे दिसतंय. बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणारी माणसं आणि दुसऱ्या राज्यात कोरोना रुग्ण मोजले जात नसल्याने त्यांची आकडेवारी समोर येत नाही. त्याठिकाणी कोरोना असेल तर पण संख्या समोर येत नाही असं राज ठाकरे म्हणाले होते. यावरून आता काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. बहिरा नाचे आपन ताल, असं म्हणत संजय निरुपम यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना कोरोनाबाबत जबाबदार धरल्याचं वृत्त संजय निरुपण यांनी शेअर केलं आहे. निरुपम यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?"मी मागेही सांगितलं होतं, बाहेरून येणाऱ्या माणसांची कोरोना चाचणी करावी असं सांगितलं होतं, परंतु सरकारने ते केलं नाही. आपण या सगळ्या गोष्टीला बंधन घालत नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक घरात अडकून पडतोय. त्यामुळे सगळ्या लोकांची वाताहत होणं हे चांगले लक्षण नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे भेटीची विनंती केली होती, परंतु त्यांच्या आसपासच्या अनेक लोकांना कोरोना झाल्यानं मुख्यमंत्रीही क्वारंटाईन आहेत, त्यामुळे झूमवर आमचं बोलणं झालं. पुन्हा एकदा लॉकडाऊन असं लोकांमध्ये पसरलं, रुग्णसंख्या वाढतेय. मी तक्रारींचा पाढा वाचला नाही तर सूचनांचा पाढा वाचला," असं राज ठाकरेंनी सांगितलं.