मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर आता यावरुन राजकीय नेत्यांमध्ये वाद पेटला आहे. या प्रकरणात सुडबुद्धीने विनाकारण आदित्य ठाकरे यांचे नाव गोवण्यात येत असल्याचं सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुशांतच्या कुटुंबाला टार्गेट केले होते, त्यावरुन संजय राऊत यांना काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी लक्ष्य केले आहे.
काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विट करुन म्हटलं आहे, शिवसेना खासदार संजय राऊत सुशांत राजपूतच्या कुटुंबाबद्दल खुजी भाषा वापरत आहेत. प्रत्येक कुटुंबात काहीतरी कहाणी असते, शिवसेनेवाल्यांच्या तर अनेक आहेत. पण सुशांत सिंगचा मृत्यू हा एक संवेदनशील विषय आहे. शिवसेनेने संवेदनशीलता दाखवावी ना की खुजेपणा अशा शब्दात निरुपम यांनी राऊतांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये अनेक आरोप केले होते. बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक एफआयआर दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुस-या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी बिहार पोलिसांवर निशाणा साधला होता.
दरम्यान आता या प्रकरणावरुन संजय राऊत यांच्याविरोधात सुशांतच्या कुटुंबीयांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं सांगितलं आहे. सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजपा आमदार नीरज कुमार सिंग बबलु यांनी संजय राऊतांनी केलेले सगळे आरोप धुडकावून लावलेत. शिवाय या आरोपांवर तीव्र संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी आमच्या कुटुंबावर केलेला लज्जास्पद आरोप निंदनीय आहे. याविरोधात आम्ही मानहानी दावा करू असं त्यांनी म्हटलं आहे.