"पंतप्रधान नरेंद्र मोदींची दाढी वाढत गेली, तसा जीडीपी घसरत गेला"; काँग्रेस नेत्याचा 'ग्राफिकल' टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 11:50 AM2021-03-03T11:50:12+5:302021-03-03T11:54:41+5:30
Shashi tharoor on Pm Narendra Modi : देशाच्या जीडीपीमध्ये पहिल्या तिमाहीदरम्यान २४ टक्के, तर दुसऱ्या तिमाहीदरम्यान ७.५ टक्क्यांची घसरण झाली.
देशाच्या जीडीपीवरुन पुन्हा एकदा काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी २०१७ पासून २०१९-२० या वर्षांतील जीडीपीच्या आकडेवारीची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाढीशी केली आहे. त्यांनी एक ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. शशी थरूर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मोदींच्या दाढीची साईजही वेगवेगळी आहे.
शशी थरूर यांनी एका ग्राफिकसोबत त्यांचे हे फोटो शेअर केले आहेत. २०१७-१८ च्या चौथ्या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी ८.१ टक्के होता. जो २०१९-२० च्या दुसऱ्या तिमाहीत ४.५ टक्के राहिला. यालाच ग्राफिक्स इलस्ट्रेशनचा अर्थ म्हणतात असं कॅप्शनही त्यांनी याला दिलं आहे. पुढील काळात देशाच्या जीडीपीमध्ये सकारात्मक वाढ होऊ शकते अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे जीडीपीमध्ये घसरण झाली होती.
This is what is meant by a "graphic illustration"! pic.twitter.com/QYyA2lN2W0
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) March 2, 2021
२०२०-२१ दरम्यान जीडीपीमध्ये ६.८ टक्क्यांची घसरण दिसून येऊ शकते असं डीबीएस बँकेनं जारी केलेल्या एका अहवालात म्हटलं आहे. २०२० च्या अखेरच्या तिमाहीत जीडीपीचा दर सकारात्मक होऊ शकतो असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. देशात कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानं आणि लोकांनी पुन्हा खर्च करण्यास सुरू केलं आहे हे दोन्ही मुद्दे डिसेंबर २०२० च्या तिमाहीसाठी चांगले ठरतील, असं मत डीबीएस समूहाच्या अर्थविषयक तज्ज्ञ राधिका राव यांनी व्यक्त केलं.