'मेडल नक्की कुणी जिंकलंय?', पोस्टरवर मीराबाई चानूपेक्षा मोदींचा फोटो मोठा!; काँग्रेसनं साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 02:42 PM2021-07-28T14:42:29+5:302021-07-28T14:44:45+5:30
Mirabai Chanu: मीराबाई चानूच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या बॅनरवरुन काँग्रेसनं भाजपावर जोरदार टीका केली आहे.
Mirabai Chanu: टोकियामध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्याच दिवशी रौप्य पदाकाची कमाई करुन भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं इतिहास रचला. मीराबाई चानू भारतात परतल्यानंतर तिचं जंगी स्वागत झालं, तर संपूर्ण देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मीराबाईचं कौतुक केलं. देशाचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन करुन मीराबाईचा सत्कार केला. यावेळी माजी क्रीडा मंत्री आणि सध्याचे कायदेमंत्री किरण रिजिजू देखील उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या बॅनरवरुन काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे.
युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी मीराबाई चानूच्या सत्कार कार्यक्रमातील एक फोटो ट्विट केला आहे. यात कार्यक्रमाच्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोसह रौप्य पदक विजेत्या मीराबाई चानूचाही फोटो छापण्यात आला आहे. पण यात मीराबाईपेक्षा पंतप्रधान मोदींचा फोटो मोठा छापण्यात आला आहे. याच मुद्द्यावरुन श्रीनिवास बी.व्ही यांनी ट्विट करत "बॅकग्राऊंडमधील फोटोचा आकार पाहून सांगा की टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक नेमकं कुणी जिंकलं?", असा सवाल उपस्थित केला. त्यावर ट्विटरकरांनी देखील जोरदार प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
बैकग्राउंड में तस्वीरों की SIZE देखकर बताइए
— Srinivas B V (@srinivasiyc) July 27, 2021
Tokyo-Olympic में मेडल किसने जीता? pic.twitter.com/8pg5mQ1J74
"प्रत्येक गोष्टीसाठी पंतप्रधानांचा फोटो लावणं खरंच गरजेचं आहे का? जेव्हा भारतीय क्रिकेट संघानं २०११ साली वर्ल्डकप जिंकला तेव्हा चषक स्वीकारताना पारितोषिक वितरण समारंभात पोस्टरवर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा फोटो पाहिला होता का?", असा सवाल एका ट्विटरकरानं उपस्थित केला आहे. तर एकानं "लंडन ऑलिम्पिकवेळी भारतानं ६ पदकांची कमाई केली होती. पण त्यावेळी अशापद्धतीचा दिखावा लावण्यात आलं नव्हतं", असं म्हटलं आहे. अनेकांनी या कार्यक्रमाच्या पोस्टरवर मोदींच्या फोटोची मूळात गरजच काय? असाही सवाल केला आहे.