मुंबई/बीड/गडचिरोली: मित्रपक्ष खंजीर खुपसत असल्याचं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केल्यानंतर आता राज्यातील काँग्रेसच्या इतरही नेत्यांनी शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर शरसंधान साधलं आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामं होत नसल्याचा तक्रारीचा सूर नेत्यांनी लावला आहे. नाना पटोलेंनी लोणावळ्यातल्या मेळाव्यात मित्रपक्षांबद्दलची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवल्यानंतर आता काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबद्दलची नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे काँग्रेस कार्यकर्त्यांची कामं करत नसल्याचा आरोप गडचिरोली काँग्रेस अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी केला. तर काँग्रेस किसान सेलचे प्रदेशाध्यक्षांनी बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुंडे केवळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कामं करतात. काँग्रेस कार्यकर्त्यांची कामं मार्गी लावत नाहीत, असा काँग्रेस किसान सेलचे प्रदेशाध्यक्षांचा आरोप आहे. बीड, गडचिरोलीसोबतच सोलापूर, वर्ध्यातील काँग्रेस नेत्यांनीदेखील शिवसेना, राष्ट्रवादीचे मंत्री आपली कामं करत नसल्याचं म्हटलं आहे. निधी वाटपात अन्याय होत असल्याचीदेखील काँग्रेस नेत्यांची तक्रार आहे.
दोन दिवसांपूर्वी काय म्हणाले होते नाना पटोले?राज्यात काँग्रेसची स्वबळावर सत्ता येईल, मुंबई महापालिकेची निवडणूक पक्ष स्वबळावर लढवेल, अशी विधानं करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दोन दिवसांपूर्वी लोणावळ्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं. कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पटोलेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादीबद्दलची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. युती अन् आघाडीची चिंता न करता कामाला लागा, शिवसेना बळकट करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या जिल्हाप्रमुखांना देतात, तेव्हा ते चालतं. पण तेच मी बोललो तर त्रास होतो, अशा शब्दांत पटोलेंनी त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त केली.
पुण्याचा पालकमंत्री आपला नाही. ते पद बारातमीवाल्यांकडे आहे. त्यांच्या माध्यमातून आपली किती कामं होतात, असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला. 'प्रत्येक कामात पालकमंत्र्यांची स्वाक्षरी लागते. एखाद्या समितीवर कोणाला घ्यायचं असेल तर यांची स्वाक्षरी लागते. तेव्हा ते आपल्याला मदत करतात का? तुम्हाला होत असलेला त्रास लक्षात ठेवा. त्या त्रासानं मानसिकदृष्ट्या खचून जाऊ नका. त्या त्रासालाच तुमची ताकद बनवा,' असं आवाहन करत पटोलेंनी कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवला.
'त्यांना समझोता करायचा नसेल, सोबत राहून पाठीत खंजीरच खुपसायचा असेल तर ठीक आहे. तुम्हाला आज होत असलेला त्रास लक्षात ठेवा आणि कामाला लागा. पुण्याचा पालकमंत्री आपला असेल. त्या खुर्चीवर आपला माणूस बसेल अशी शपथ घ्या. खचून जाऊ नका. कमजोर होऊ नका. मी इथला पालकमंत्री होईन असा निर्धार करा. तुम्ही आम्हाला आमचा हिस्सा देत नाही. ठीक आहे. आम्ही आमच्या कर्मानं, मेहनतीनं तो मिळवू,' अशा शब्दांत पटोलेंनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं आवाहन केलं.